IND vs PAK: Asia Cup 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा एकदा भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (४ सप्टेंबर) होणाऱ्या सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या हायव्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल तर बाबर आझम पाकिस्तानी संघाची धुरा सांभाळणार आहे. गेल्या रविवारीच भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता, त्यामुळे आज पाकिस्तान हिशेब चुकता करण्याच्या इराद्याने तर भारतीय संघ विजयी लय कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
आपण जर आशिया चषकाच्या इतिहासावर नजर टाकली तर भारतीय संघ पाकिस्तानवर चांगलाच भारी पडला आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण १५ सामने झाले आहेत, ज्यापैकी भारतीय संघाने ९ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानच्या संघाने पाच सामने जिंकलेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
आशिया कपमधील भारत-पाक सामन्यांचे निकाल:-
१९८४: भारत ८४ धावांनी विजयी, शारजाह
१९८८: भारत ४ गडी राखून विजयी, ढाका
१९९५: पाकिस्तान ९७ धावांनी विजयी, शारजाह
१९९७: निकाल नाही, कोलंबो
२०००: पाकिस्तान ४४ धावांनी विजयी, ढाका
२००४: पाकिस्तान ५९ धावांनी विजयी, कोलंबो
२००८: भारत ६ गडी राखून विजयी, कराची
२००८: पाकिस्तान ८ विकेट्सने विजयी, कराची
२०१०: भारत ३ गडी राखून विजयी, दांबुला
२०१२: भारत ६ गडी राखून जिंकला, मीरपूर
२०१४: पाकिस्तान १ विकेटने जिंकला, मीरपूर
२०१६: भारत ५ गडी राखून जिंकला, मीरपूर
२०१८: भारत ८ गडी राखून विजयी, दुबई
२०१८: पाकिस्तान ९ गडी राखून विजयी, दुबई
२०२२: भारताचा ५ गडी राखून विजय, दुबई
दरम्यान, गेल्या रविवारी भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या रवींद्र जाडेजाची संघाला यावेळी उणीव भासणार आहे. तो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात घेण्यात आले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मागील सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने जाडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले आणि उजव्या-डाव्या फलंदाजांचे कॉम्बिनेशन साधण्याचा प्रयत्न केला. त्यात भारत यशस्वी झाला. रविवारीही कर्णधार रोहित शर्मा आणि द्रविड असाच निर्णय घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. डाव्या हाताच्या फलंदाजाचा टॉप ६ फलंदाजांमध्ये समावेश करायचा असेल, तर त्यासाठी फक्त रिषभ पंत हाच पर्याय आहे. हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताला पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवून देण्यात मदत झाली. त्यामुळे या सामन्यातही रोहितला त्याच्यासह इतर खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल हे नक्की.
Web Title: IND vs PAK Asia Cup who is better team in tournament Team India or Pakistan see stats Rohit Sharma vs Babar Azam
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.