IND vs PAK Asia Cup 2022: भारत (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील रोमांचक असा क्रिकेट सामना क्रिकेट चाहत्यांना तब्बल वर्षभराने पाहायला मिळणार आहे. महिन्याच्या अखेरीस यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये २८ ऑगस्टला हा सामना रंगणार आहे. २७ ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. गेल्या वेळी टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान दोन संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी पाकिस्तानने १० विकेट्सने भारतावर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदा भारताला हिशेब चुकता करण्याची संधी आहे. तशातच, पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटून एक मोठं विधान केलं आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची गणना सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होते. त्याच्याबद्दल पाकिस्तानचा शादाब खान याने अतिशय मोठे विधान केले आहे. फुटबॉलच्या जगतात सध्याच्या घडीला लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टीएनो रोनाल्डो हे दोन सर्वोत्तम फुटबॉलपटू आहेत. त्या दोघांसारख्याच प्रतिभेचा मिलाफ म्हणजे बाबर आझम असा दावा पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने केला आहे.
बाबर आझम आणि पाकिस्तान संघातील काही खेळाडूंनी नेदरलँड्सच्या टॉप-टियर फुटबॉल क्लब मानल्या जाणाऱ्या अॅमस्टरडॅमशे फुटबॉल क्लब अजाक्सला (एएफसी अजाक्स) भेट दिली. त्यांनी काही प्रसिद्ध फुटबॉलपटूंची भेट घेतली. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बाबर आझमची ओळख करून देताना भन्नाट उत्तर दिले. शादाबने मँचेस्टर युनायटेडचा माजी गोलकीपर एडविन व्हॅन डर सारच्या प्रश्नाचे उत्तर देताना बाबरकडे बोट दाखवले आणि म्हणाला की 'हा क्रिकेटचा ख्रिस्तियानल मेस्सी आहे’, असे सांगितले. पाहा शादाबच्या भन्नाट उत्तराचा व्हिडीओ-
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील राजकीय मुद्द्यांमुळे २०१२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कोणतीही द्विपक्षीय मालिका या दोघांच्यात खेळली गेलेली नाही. टीम इंडिया आणि पाकिस्तान नेहमी फक्त ICC टूर्नामेंट किंवा आशिया कपमध्येच एकमेकांसमोर खेळताना दिसतात. आशिया चषकानंतर भारत आणि पाकिस्तान यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही खेळणार आहेत. दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे २३ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. १६ ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून फायनलचा सामना १३ नोव्हेंबरला रंगणार आहे.
Web Title: Ind vs Pak Babar Azam is Cristiano Ronaldo and Lionel Messi of cricket says Pakistan All Rounder Shadab Khan Asia Cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.