Ind vs Pak, Asia Cup 2022: आशिया चषक २०२२ मध्ये टीम इंडिया २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताला हा सलामीचा सामना असणार आहे. या शानदार सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. दोन्ही संघात सर्वोत्तम ११ खेळाडूंचा समावेश केला जाईल यात काहीच वाद नाही. अनेक चाहते आपला आवडता संघही निवडून लागले आहेत. असे असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने यांनी कोलकाता येथील पत्रकार परिषदेत कार्यक्रमात भारत-पाकिस्तान सामन्यासह इतर मुद्द्यांवर आपले मत मांडले.
भारत-पाकिस्तान सामना हा फक्त एक सामना आहे अशा अर्थाने पाहायला हवे. भारतीय संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. सामन्याआधीचे दडपण कसे हाताळायचे हे त्या सर्वांना माहीत आहेत, असे मत सौरव गांगुलीने व्यक्त केले. गांगुली आज हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या कामगिरीवरही बोलला. तसेच, आशिया चषकातील आपल्या आवडत्या संघाबद्दलही त्याने मत सांगितले.
कोणता संघ ठरणार फेव्हरिट?
"भारत विरुद्ध पाकिस्तान सामना फक्त एक सामना आहे. जे लोक नियमितपणे खेळतात किंवा जेव्हा मी खेळायचो तेव्हा मी पाकिस्तान विरूद्धचा सामना विशेष मानत नव्हतो. नॉकआऊट सामन्यांमध्ये अतिरिक्त दबाव असतो. पण तसं काही वाटून घ्यायचे नसते. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल हे सर्व अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना दबाव कसा हाताळायचा हे माहित आहे. त्यांच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. मात्र जर स्पर्धेतील फेव्हरिट संघाबाबत बोलायचे झाले तर, T20 क्रिकेटमध्ये कोणीही फेव्हरेट संघ नसतो. प्रत्येकजण चांगला संघ असतो आणि ठराविक दिवशी जो संघ चांगला खेळतो तोच संघ जिंकतो", असे रोखठोक मत गांगुलीने व्यक्त केले.
"भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 'एक्स फॅक्टर' आहे. ही कोणतीही जादू नाही किंवा नवी गोष्ट नाही. १९९२ ते २०२२ या विश्वचषकात भारत फक्त एकदाच हरला. म्हणजेच भारताने ३० वर्षांत फक्त एकदाच पराभव पत्करला. अशा वेळी हे स्पष्ट होते की जो चांगला खेळेल, तोच संघ सामना जिंकेल. संघात अनेक X फॅक्टर आहेत. रोहित शर्मा, विराट, पंत, राहुल, हार्दिक, सगळेच चांगले आहेत. तसेच पाकिस्तानी संघातही बाबर आझम, रिझवान यांसारखे चांगले खेळाडू आहेत. शाहिन आफ्रिदी किंवा जसप्रीत बुमराह संघात नसल्याने फारसा फरक पडणार नाही. कारण सांघिक खेळात एक खेळाडू मोठा फरक पाडू शकत नाही", असेही गांगुली म्हणाला.