Join us  

पाकिस्तानमुळे वर्ल्ड कप वेळापत्रक लटकले, BCCI ने संतापून फैलावर घेतले

ICC World Cup 2023 Schedule : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तीन महिन्यांवर आली असताना आयसीसीनं अद्याप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:02 AM

Open in App

ICC World Cup 2023 Schedule : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तीन महिन्यांवर आली असताना आयसीसीनं अद्याप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. यजमान भारताने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट ICC कडे पाठवला आहे, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) काही सामन्यांवर आक्षेप घेतल्याने विलंब होत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या बंगळुरू ( वि. ऑस्ट्रेलिया) आणि चेन्नई ( वि. अफगाणिस्तान) येथील सामन्यावर PCB चा आक्षेप आहे आणि त्यांनी त्या सामन्यांची अदलाबदल करण्याची मागणी केली आहे. अशात आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने PCBला फैलावर घेतले आहे.

आयसीसी पुढील आठवड्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. मागील आठवड्यात आयसीसीने तो ड्राफ्ट बीसीसीआय व पीसीबीला पाठवला आहे आणि त्यांची मतं  विचारली आहेत. भारताकडून त्या वेळापत्रकावर कोणताच आक्षेप नाही, पण, PCB ने दोन सामन्यांच्या अदलाबदलीची मागणी केलीय. त्यामुळे वेळापत्रकाला विलंब होतोय. ''PCB काही म्हणू शकतात, परंतु त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होतोय. पहिल्यांदा त्यांनी अहमदाबाद येथे खेळण्यास नकार दिला, आता ते चेन्नईत खेळण्यास तयार नाहीत. ते नेहमीच असुरक्षित असल्यासारखे वागतात,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्ट्सला सांगितले.  

 सुरुवातीला नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार देणाऱ्या पाकिस्तानला आता चेन्नईत अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यासही हरकत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) हा सामना बंगळुरू येथे खेळवावा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चेन्नईत खेळवावा अशी मागणी केली आहे. अफगाणिस्तानच्या संघात अव्वल दर्जाचे फिरकीपटू आहेत आणि चेन्नईची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी पोषक असल्याने पाकिस्तानला धडकी भरली आहे. BCCI ने मुद्दाम अफगाणिस्ताविरुद्धचा सामना चेन्नईत ठेवल्याचा आरोप PCB कडून केला जात आहे. 

पाकिस्तान ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी क्वालिफायरमधून प्रगती करणाऱ्या दोन संघांविरुद्ध आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( २० ऑक्टोबर, बंगळुरू), अफगाणिस्तान ( २३ ऑक्टोबर) आणि दक्षिण आफ्रिका ( २७ ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध चेन्नईत सामना होईल. बांगलादेश (३१ ऑक्टोबर, कोलकाता), न्यूझीलंड ( ५ नोव्हेंबर, बंगळुरू) आणि इंग्लंड ( १२ नोव्हेंबर, कोलकाता) येथे पाकिस्तानचे सामने होतील. आयसीसीने अद्याप वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App