मेलबर्न - टी-२० विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या लढतीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज शान मसूदला सराव करत असताना डोक्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्याला स्कँनसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
मोहम्मद नवाजने मारलेल्या फटक्यावर मसूदच्या डोक्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाली. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाची डोकेदुखी वाढली आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत शान मसूदने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पाकिस्तानच्या संघामध्ये मसूदची स्पर्धा ही फकर जमांसोबत आहे. फकरसुद्धा दुखापतीतून सावरून संघात परतला आहे. तोही तिसऱ्या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात डोक्याला मार लागल्यानंतर तो जमिनीवर पडलेला दिसत आहे. इतर खेळाडू त्याच्या आजूबाजूला दिसत आहेत. तसेच मेडिकल स्टाफ त्याच्यावर उपचार करताना दिसत आहे. मात्र नंतर अधिक उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
३३ वर्षीय शान मसूदने १२ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण २२० धावा जमवल्या आहेत. यादरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट हा ११५ एवढा राहिला आहे. त्याने या सामन्यात दोन अर्धशतकेही फटकावली आहेत.