कराची - टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात रविवारी भारताकडून पराभव झाल्यामुळे स्पर्धेबाहेर पडण्याच्या स्थितीत असलेल्या पाकिस्तान संघावर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. माजी कर्णधार सलीम मलिक याने इमाद वसीम याच्यावर हेतुपुरस्सर चेंडू व्यर्थ घालवल्याचा आरोप केला. न्यूयॉर्कमध्ये १२० धावांचे लक्ष्य गाठताना पाक संघ ७ बाद ११३ पर्यंतच मजल गाठू शकला. पाकने ५९ चेंडू निर्धाव खेळले. भारताने सामना सहा धावांनी जिंकला. वसीमने २३ चेंडूंत १५ धावा काढल्या. यावर मलिक म्हणाला, ‘वसीमच्या खेळीवर नजर टाकल्यास तो धावा काढण्याऐवजी चेंडू वाया घालवत होता आणि लक्ष्य आणखी कठीण करीत होता, असे जाणवते.’
माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने पाक संघात काही तरी शिजत असल्याची शंका व्यक्त केली. काही खेळाडू बाबर आझमबाबत नाराज असल्याचे दिसते. आफ्रिदी पुढे म्हणाला, ‘कर्णधाराने सर्वांना सोबत घेत वाटचाल करावी. विश्वचषक संपल्यानंतर बरेच काही स्पष्टपणे बोलणार आहे. शाहिनसोबतचे माझे संबंध पाहता मी त्याच्याबाबत बोललो, तर लोक म्हणतील जावयाची बाजू घेतो. ऐन विश्वचषकाआधी शाहिनची कर्णधारपदावरून उचलबांगडी झाली. तो कर्णधार असताना पाकने न्यूझीलंडविरुद्ध केवळ एक मालिका खेळली.’
माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाकच्या खराब खेळावर सडकून टीका केली. तो म्हणाला, ‘बाबरच्या नेतृत्वाखालील हा संघ ‘सुपर एट’ गाठण्याचा हकदार नाही. आज संपूर्ण देश निराशेच्या छायेत आहे. मनोबल ढासळले आहे. तुम्ही कुठल्याही प्रकाराने जिंकण्याचा निर्धार दाखविलेला नाही.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने पाक संघात आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे सांगितले. वॉन म्हणाला, ‘कधीकधी खराब खेळपट्टीवर फार चांगले निकाल पाहायला मिळतात. हा त्यातील एक सामना होता. आपण जिंकू शकतो, हा विश्वास पाक संघात नव्हताच.’