आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या लढतीत भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांची दाणादाण उडाली आहे. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांकडून होत असलेल्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत आहेत. कुलदीप यादवने एकाच षटकात दोन धक्के दिले, तर बुमराहने मोहम्मद रिझवान आणि शादाब खान यांच्या दांड्या गुल केल्या, त्यामुळे ३६ व्या षटकाअखेर पाकिस्तानची अवस्था ७ बाद १७१ अशी झाली आहे.
प्रथम फलंदाजी करताना दोन्ही सलामीवीर मोठी खेळी करण्याआधीच माघारी परतल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा डाव सावरला होता. मात्र बाबर आझम अर्धशतकी खेळी करून मोहम्मद सिराजची शिकार झाला. बाबर ५० धावा काढून बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला.
३३ व्या षटकामध्ये कुलदीप यादवने सौद शकील (६) आणि इफ्तिकार अहमद (४) यांना माघारी धाडले. तर एक बाजू लावून धरणाऱ्या मोहम्मद रिझवानचा जसप्रीत बुमहारने ३४ व्या षटकात त्रिफळा उडवला. या धक्क्यांमधून पाकिस्तानचा संघ सावरण्यापूर्वीच बुमराहने ३६ व्या षटकात शादाब खानची दांडी गुल केली.