Mohammad Shami, IND vs PAK: भारताला टी२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानकडून १० विकेट्सने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी गोलंदाजांना पाकिस्तानला रोखता आलं नाही. बाकीच्या गोलंदाजांनाही भरपूर मार पडला. या सामन्यानंतर मोहम्मद शमीवर काही चाहत्यांनी धार्मिक मुद्द्यावरून टीका केली. या टीकेनंतर अनेकांनी त्या टीकाकारांना सुनावलं आणि शमीला जाहीरपणे पाठिंबा दिला. या साऱ्या घडामोडींबद्दल शमीच्या काय भावना होत्या, ते त्याने नुकतंच स्पष्ट केलं.
"अशा प्रकारचा विचार करणाऱ्यांवर काहीही उपाय नाही. जे लोक एखाद्या खेळाडूवर त्याच्या धर्मावरून टीका करतात, ते खरे चाहते नसतात. ते लोक खरे भारतीय नाहीतच. जर तुम्ही खेळाडूला हिरोप्रमाणे पाहता, तर त्याप्रकारे त्याच्याशी वागा-बोलायला हवं. खरे भारतीय समर्थक किंवा चाहते अशा प्रकारची वर्तणूक करत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा विकृत विचार करणाऱ्या चाहत्यांच्या कमेंट्सकडे कोणीही फारसं लक्ष देऊ नये आणि त्यांच्या टीकांबद्दल कोणीही वाईट वाटून घेऊ नये", अशी रोखठोक भूमिका शमीने व्यक्त केली.
"माझ्यावर जेव्हा टीका होत होती त्यावेळी माझ्या मनात एकच विचार सुरू होता. जर मी कोणाला माझा आदर्श मानत असेन, तर मी त्या व्यक्तीबद्दल कधीही अशा पातळीवर जाऊन टीका करणार नाही. आणि जर मी दुखावला जाईन असं कोणी बोलत असेल तर ती व्यक्ती माझा फॅन नसेल. आणि ती व्यक्ती भारतीय संघाचीही फॅन नसेल. त्यामुळे अशा प्रकारची लोकं काय बोलतात याचा मला काहीही फरक पडत नाही", असंही शमीने स्पष्ट केलं.