Champions Trophy 2025, IND vs PAK: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवरून सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) आपला संघ पाकिस्तान दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जाणार नाही, असे भारताने ICC ला कळवले असल्याचे बोलले जात आहे. पण तसा कुठलाही लेखी दस्तावेज अद्याप सादर झालेला नसल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानी माजी खेळाडू रोज भारताच्या नावाने खडे फोडत आहेत. तशातच आज पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफ याने तर एक वेगळाच पर्याय सुचवला आहे.
"पाकिस्तान आता भारताशी क्रिकेट खेळणं पूर्णपणे थांबवू शकतो अशी शक्यता दिसत आहे. मी जर बोर्डाचा अध्यक्ष असतो तर मी नक्कीच कठोर पावलं उचलली असती. मी सध्या कुणालाच दोष देत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की भारताला जर पाकिस्तानात येऊन खेळायचं नसेल तर त्यांनी जगाच्या पाठीवर कुठेही पाकिस्तानशी क्रिकेट खेळूच नये. मी निर्णय घेणाऱ्यांच्यात असतो तर मी असाच निर्णय घेतला असता आणि बीसीसीआयला थेट भिडलो असतो," असे राशिद लतीफ म्हणाला.
ICC ला सुचवला विचित्र उपाय
"क्रिकेटसारख्या खेळात भारत आणि पाकिस्तानकडून जर राजकारण आणलं जात असेल तर या दोघांवर बंदी का घालत नाहीत? पण ICC तसं करणार नाही कारण त्यांचं बरचंसं उत्पन्न हे या दोन संघाच्या खेळावर अवलंबून असतं. अशा परिस्थितीत मला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वाद जोपर्यंत शांत होत नाही आणि त्यांच्यातील समस्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत दोन्ही देशांना कुठल्याही ICC स्पर्धांच्या यजमानपदाचे हक्क देऊच नयेत," असा विचित्र उपाय लतीफने सुचवला.
BCCI दोषी आहे!
"चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत बोलायचे तर मला असे वाटते की बीसीसीआय दोषी आहे. कारण ICCचे पथक येऊन पाकिस्तानातील सुरक्षेची पाहणी करुन गेलेले आहे. त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी तसे ICC कडे लेखी स्वरूपात द्यायला हवे. पण त्यांनी कुठलीही बाब लेखी दिलेली नाही. केवळ तोंडी गोष्टींवर चर्चा सुरु आहेत. अधिक वेदनादायी गोष्ट अशी आहे की केवळ भारताला पाकिस्तानात खेळायचे नाही म्हणून प्रत्येक वेळी पाकिस्तानचे यजमानपद बाहेर घेऊन जावे लागते. त्यामुळे ICCकडून मिळणारा निधी वाया जातो. पाकिस्तानसारख्या क्रिकेट बोर्डाला इतका मोठा तोटा परवडणारा नाही," असेही तो स्पष्टपणे म्हणाला.