नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) चे बिगुल वाजण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धेचे प्रबळ दावेदार असलेले भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. बहुचर्चित स्पर्धेच्या पूर्वी पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान कादिरने मोठे वक्तव्य केले आहे. त्याचे वडील दिवंगत अब्दुल कादिर यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याला भारताविरुद्ध चांगली कामगिरी करायची आहे.
भारताविरूद्ध संधी मिळाल्यास फायदा घ्यायला आवडेल कादिरने जिओ न्यूजशी संवाद साधताना म्हटले, "माझ्या वडिलांची भारताविरुद्धची कामगिरी चांगली होती. मलाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगले काम करायचे आहे. आशिया चषक स्पर्धेत मला भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर मला त्याचा फायदा घ्यायला आवडेल", अशा शब्दांत कादिरने भारताविरूद्ध आपल्याला संधी मिळावी असे सूचक विधान केले आहे.
पाकिस्तानसाठी १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला कादिर म्हणाला, "नेदरलॅंड्सविरूद्ध पाकिस्तानच्या संघाने शानदार कामगिरी केल्यामुळे आशिया चषकात देखील आम्ही भारतासह इतर संघाविरोधात उल्लेखणीय कामगिरी करू असा आम्हाला विश्वास आहे". आशिया चषक २०२२ चा थरार २७ ऑगस्टपासून रंगणार आहे. तसेच स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान रविवारी २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.