वन डे विश्वचषकातील भारत विरूद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पाडला. हा सामना म्हणजे पाकिस्तानी गोलंदाज विरूद्ध भारतीय फलंदाज असे वातावरण तयार करण्यात आले होते. पाकिस्तानी संघात वेगवान गोलंदाजांची फळी असून भारतीय टॉप ऑर्डरला सतावण्याची त्यांच्यात धमक असल्याचा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला. पण, रोहित शर्माने पाक गोलंदाजांची चांगलीच धुलाई करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आशिया चषकातील साखळी फेरीच्या सामन्यात भारताची डोकेदुखी वाढवणाऱ्या शाहीन आफ्रिदीला देखील रोहितने षटकार ठोकला.
चालू विश्वचषकात शाहीनला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्याच्याकडे असलेली क्षमता आणि गती याचा पाक गोलंदाजाला फायदा घेता आला नाही. नेदरलँड्स आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत तो १०३ धावांत केवळ दोन बळी घेऊ शकला. त्यामुळे भारताविरूद्धच्या सामन्यातून शाहीन पुनरागमन करेल असा विश्वास पाकिस्तानी चाहत्यांना होता. पण, भारतीय कर्णधार रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून शाहीनवर दबाव टाकला. आफ्रिदीने आपल्या दुसऱ्या षटकात शुबमन गिलला बाद केले पण रोहित शर्माने चौकार आणि षटकारांचा पाऊस कायम ठेवला. हिटमॅनच्या आक्रमक अवतारासमोर शाहीन हताश दिसला.
शास्त्रींनी आफ्रिदीची केली पोलखोल दरम्यान, शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीवर बोलताना भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्यावर टीका केली. नवीन चेंडूमुळे शाहीन अधिक घातक होतो या पसरलेल्या प्रचाराला शास्त्रींनी लक्ष्य केले. शाहीनची अनेकदा त्याच्या डाव्या हाताच्या कौशल्यासाठी पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रमशी तुलना केली जाते. याचाच दाखला देत शास्त्रींनी सांगितले की, शाहीन आफ्रिदी हा वसिम अक्रम नाही, त्याला उगीचच डोक्यावर घेऊ नका. शाहीन आणि अक्रम याच्यात खूप फरक आहे हे पाकिस्तानने मान्य केले पाहिजे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना शास्त्रींनी म्हटले, "शाहीन आफ्रिदी नवीन चेंडूवर चांगला गोलंदाज आहे आणि बळी घेऊ शकतो. पण त्याच्यात विशेष काही नाही. तोही इतरांसारखा एक गोलंदाज आहे, एवढा मोठा कोणी नाही. शाहीन शाह आफ्रिदी हा वसीम अक्रम तर नक्कीच नाही. तुम्हाला हे सत्य स्वीकारावे लागेल. उगीचच त्याला डोक्यावर घेऊ नका."
भारताचा सहज विजय पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.