मेलबर्न - भारतीय संघाने टी-२० विश्वचषकामधील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करत भारतीय संघाने मेलबर्नमध्ये दणक्यात दिवाळी साजरी केली. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. नाबाद ८२ धावांची खेळी करणाऱ्या विराटला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. पाकिस्तानविरुद्धच्या तुफानी मॅचविनिंग खेळीनंतर प्रतिक्रिया देताना विराट कोहली भावूक झाला. त्याला बोलण्यासाठी शब्दही सुचेनात.
पाकिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे चार फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले, त्यानंतर अखेरच्या ३ षटकांत पन्नासच्या आसपास धावांची गरज असताना तुफानी फटकेबाजी करत विराटने सामना खेचून आणला. सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाही आहेत. हे कसं घडलं हेच मला कळत नाहीये. आपण शेवटपर्यंत उभे राहूया आणि काय होतंय ते पाहूया असं हार्दिकने मला सांगितले, असं विराट म्हणाला.
यावेळी पाकिस्तानी गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्यासाठी आखलेल्या खास रणनीतीचाही विराटने उलगडा केला. तो म्हणाला, जेव्हा शाहीर आफ्रिदी पॅव्हेलियन एंडकडून गोलंदाजी करत होता, तेव्हा मी हार्दिकला सांगितले की, आपत त्याच्यावर आक्रमण करून. आमचं गणित सोपं होतं. नवाजचं एक षटक शिल्लक होतं. त्यामुळे हॅरिसच्या गोलंदाजीवर हल्ला केल्यास ते दबावात येतील, असं आम्हाला वाटत होतं, अखेर शेवटच्या षटकात ६ चेंडूत १६ धावा असं समिकरण निर्माण झालं.
दरम्यान, ही तुझी सर्वोत्तम टी-२० खेळी आहे का असं विचारलं असता विराट म्हणाला की, आजपर्यंत मी माझी मोहालीतील खेळी सर्वोत्तम असल्याचे सांगतो. त्यावेळी मी ५२ चेंडूत ८० धावा काढल्या होत्या. आज मी ५३ चेंडूत ८२ धावा काढल्या. दोन्ही खेळी खास आहेत. गेल्या काही काळात मी फॉर्मसाठी झगडत असताना तुम्ही मला पाठिंबा दिलात. त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार, असे विराट म्हणाला.