Inzamam Ul Haq Virat Kohli, IND vs PAK: भारतीय संघाचा पाकिस्तान विरूद्धचा T20 World Cup 2022 चा सलामीचा सामना अतिशय रोमांचक झाला. १६० धावांचे आव्हान टीम इंडियाने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. मात्र सामन्यात अनेक वेळा अशी परिस्थिती होती, ज्यावेळी सामना कोणत्याही संघाच्या दिशेने झुकणे शक्य होते. भारताची खराब सुरूवात झाल्यानंतर, माजी कर्णधार विराट कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने सामन्यात विजय मिळवला. भारताने हायव्होल्टेज सामना जिंकूनही पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने एक अजब विधान केले.
"भारतीय संघ ही केवळ एकाच गोष्टीसाठी 'लय भारी' आहे. जेव्हा विराट कोहली अप्रतिम फलंदाजी करतो तेव्हाच टीम इंडिया जिंकते हे मी स्पष्टपणे सांगतो. या चर्चांना अनेक कंगोरे आहेत आणि अनेक लोक इतर फलंदाजांनाही दमदार फलंदाज म्हणत असतात. पण माझ्या मते टीम इंडियात फक्त विराट कोहलीच 'जबरदस्त' फलंदाज आहे. जर भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर विराटने पहिल्या सामन्याप्रमाणे खेळणं गरजेचे आहे. जर टीम इंडियाला वाटत असेल तरी विराट कोहलीशिवाय वर्ल्ड कप जिंकू शकतील, तर ते कदापि शक्य नाही," असे अतिशय अजब मत इंजमाम उल हकने व्यक्त केले.
"काही खेळाडू असे असतात जे भरपूर धावा करुनही संघाला सामना जिंकवून देऊ शकत नाहीत. पण काही फलंदाज असे असतात जे कितीही दबावाची स्थिती असेल तरीही आपल्या संघाला एकहाती सामना जिंकवून देऊ शकतात. विराट हा तसाच प्रतिभावान क्रिकेटर असून त्याच्या खेळाचा दर्जा सर्वात वरचा आहे. भारतीय संघ गेल्या काही दिवस संघर्ष करत होता. कारण विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेच विषय झाला होता. पण आता विराट कोहली आपल्या फॉर्मात परतला असल्याने वर्ल्ड कपमधील आगामी काही सामन्यांसाठी त्याने भारताचे पारडे जड असल्याचे दाखवून दिले आहे," असेही इंजमाम म्हणाला.
"भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे विराटला त्याची लय गवसली आहे. त्यातही पाकिस्तान सारख्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध त्याला ही लय गवसली असल्याने त्याची खासियत वेगळी आहे. वर्ल्ड कपमधील कोणत्याही सामन्यात असं घडणं शक्य होतं. पण भारताच्या सुदैवाने पहिल्याच सामन्यात त्याला सूर गवसला आणि आता त्याचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होईल", असे इंजमाम म्हणाला.