पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाने सुरुवातीच्या षटकांमध्येच सामन्यावर पकड मिळवली आहे. अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. मोहम्मद सिराजने अब्दुल्ला शफिक तर हार्दिक पांड्याने इमाम उल हकची विकेट काढली आहे.
अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक यांनी पाकिस्तानला सावध सुरुवात करून दिली. मात्र ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवण्याची चिन्हं दिसत असतानाच मोहम्मद सिराजचा यष्ट्यांच्या दिशेने येणारा एक वेगवान चेंडू शफिकच्या पायावर आदळला आणि भारतीय संघानं केलेलं अपील उचलून धरत पंचानी शफिक बाद असल्याचा निर्णय दिला. शफिक २० धावा काढून माघारी परतला.
त्यानंतर बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी मोर्चा सांभाळला. इमामने काही चांगले फटकेही खेळले. मात्र १३ व्या षटकात हार्दिक पांड्याने इमामचं काम तमाम करताना त्याला यष्टीमागे लोकेश राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. इमाम उल हकने ३८ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केली. यादरम्यानची उल्लेखनीय बाब म्हणजे बाद होण्याआधी आदल्याच चेंडूवर इमाम उल हकने हार्दिक पांड्याला खणखणीत चौकार ठोकला होता. मात्र पुढचा चेंडू टाकण्याआधी हार्दिक पांड्या चेंडू तोंडाजवळ घेऊन काहीतरी पुटपुटला. आश्चर्य म्हणजे त्याच चेंडूवर इमाम राहुलकडे झेल देत बाद झाला.
याचदरम्यान, १४ व्या षटकात रवींद्र जडेजाने मोहम्मद रिझवानला पायचित केले. पण रिझवानने घेतलेल्या डीआरएसमध्ये चेंडून यष्ट्यांना लागत नसल्याचे दिसल्याने रिझवान बचावला.