इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत भारत 'अ' संघाने कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तान 'अ' संघाला पराभूत करत विजयी सलामी दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ओमान येथील अल अमिरात क्रिकेट ग्राउंडवर रंगलेली ही लढत खूपच रोमहर्षक झाली. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्ताननं पूरेपूर जोर लावला होता. एक वेळ अशी आली होती की, सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकतोय असं वाटत होते. पण शेवटी भारतीय संघानेच बाजी मारली.
तो कॅच ठरला भारत-पाक मॅचमधील टर्निंग पाँइट
युवा टीम इंडियाने उत्तम गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नजराणा पेश करत पाकिस्तानचा डाव हाणून पाडला. यात निशांत सिंधूच्या गोलंदाजीवर रमनदीप सिंग याने हवेत उडी मारून सुपरमॅनच्या तोऱ्यात पाक बॅटर यासिर खानचा जो अफलातून झेल पकडला तो क्षण मॅचमधील टर्निंग पाँइट ठरला. हा झेल युवा भारतीय संघातील जोश अन् होश याची झलक दाखवून देणारा होता.
अशक्यप्राय वाटणारा झेल पकडत Ramandeep Singh नं टीम इंडियाला मॅचमध्ये आणलं
पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करणारा यासिर खान याने २२ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत १ खणखणीत चौकार आणि ३ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या रुपात पाकिस्तान संघाने तिसरी विकेट गमावली. तो भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरतोय असं वाटत होते. निशंत सिंधूच्या गोलंदाजीवर त्याने डिप मिड विकेटच्या दिशेने सुंदर फटका खेळला होता. त्याचा हा प्रयत्न पाकिस्तानसह त्याच्या खात्यात चार धावा निश्चित जमा करुन देणारा असाच होता. पण रमनदीप सिंग त्याच्या आडवा आला. भारताच्या या युवा खेळाडूनं अशक्यप्राय वाटणारा झेल पकडत त्याला तंबूचा रस्ता धरायला भाग पाडलं. ही विेकट भारतीय संघाला पुन्हा सामन्यात घेऊन येणारी ठरली.
युवा क्रिकेटरनं पकडलेल्या अप्रतिम कॅचच दिनेश कार्तिकला भावला
भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने सोशल मीडियावर रमणदीप सिंगनं घेतलेल्या कॅचच तोंडभरून कौतुक केलं आहे. वॉव... अविश्वसनीय अन् अद्भूत.. रमदीप सिंगनं पकडलेला हा झेल हा भारतीयाने घेतलेल्या सर्वोत्तम झेलपैकी एक आहे, अशा शब्दांत दिनेश कार्तिकनं या युवा क्रिकेटर्सच्या यशस्वी प्रयत्नाला दाद दिली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसतोय.