आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. क्रिकेट जगतातील सर्वात लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्यांनी आपापले पहिले दोन्ही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे आता सलग तिसरा विजय मिळवून विजयी हॅटट्रिक करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. तर विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
या लढतीला आता केवळ एका दिवसाचा अवधी उरला असताना अहमदाबादमधून क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे. याआधी आशिया चषक स्पर्धेमध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आला होता. त्यातील एक सामना हा अतिरिक्त दिवशी पूर्ण करण्यात आला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तब्बल एक लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार शनिवारी अहमादाबादमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची आणि पावसाची शक्यता आहे. मात्र पावसाचा अडथळा येण्याची शक्यता असली तरी सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे. पावसामुळे काही काळ खेळ थांबू शकतो.
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिल्यास भारत आणि पाकिस्तान हे संघ आतापर्यंत ७ वेळा आमनेस-सामने आले आहेत. त्या सातही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. आताही ही विजयी परंपरा कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात अगाणिस्तानवर मात केली होती. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता.