भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका बंद पडलेल्या असल्याने मोठ्या स्पर्धांमध्ये हे संघ आमने-सामने येण्याची वाट क्रिकेटप्रेमी वाट पाहत असतात. आता एशियन क्रिकेट कौन्सिलने संपूर्ण वर्षभराचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये वनडे आशिया चषक स्पर्धेचाही समावेश आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय महिला टी-२० एमर्जिंग आशिया चषक, पुरुषांचा एमर्जिंग ५० ओव्हर आशिया चषक आणि मेन्स अंडर-१९ आशिया चषक स्पर्धांमध्येही दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. त्याशिवाय यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे विश्वचषक स्पर्धा होणार आहे. येथेही भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येतील. त्याशिवाय अंडर-१९ महिला वर्ल्डकप स्पर्धेमध्येही भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येतील. म्हणजेच या सहा स्पर्धांमध्ये दोन्ही संघांमध्ये १० पेक्षा अधिक सामने खेळले जाऊ शकतील.
वनडे आशिया चषक स्पर्धा सप्टेंबर महिन्यात खेळली जाईलय मात्र या स्पर्धेचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत हे सामना त्रयस्त ठिकाणी खेळवले जाऊ शकतात. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होतील. भारत, पाकिस्तान आणि पात्र संघ क्र.१ यांना एका गटात ठेवण्यात आले आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ असतील. त्यानंतर सुपर-४ आणि अखेरीस फायनल खेळवली जाईल. म्हणजेच या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीनवेळा आमने सामने येऊ शकतात.
तर वनडे वर्ल्डकपमध्ये १० संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. सर्व संघ ९ सामने खेळतील. त्यानंतर नॉकआऊटमध्येही भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येऊ शकतात. अंडर-१९ महिला वर्ल्डकपचा विचार केल्यास भारत आणि पाकिस्तान हे वेगवेगळ्या गटांमध्ये आहेत. दोन्ही संघांमध्ये सुपर सिक्स किंवा सेमीफायनलमध्ये लढत होऊ शकते. या दोन्ही स्पर्धांमध्ये एकूण ४ सामने खेळवले जाऊ शकतात.
त्याशिवाय भारत आणि पाकिस्तानचे ज्युनियर संघ महिला टी-२० एमर्जिंग आशिया चषक, पुरुषांचा एमर्जिंग ५० षटकांचा वर्ल्डकप आणि पुरुषांचा अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेतील सामन्यासाठी सज्ज आहे. काही महिन्यांपूर्वी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने आले होते. तेव्हा विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने थरारक विजय मिळवला.