आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील महामुकाबल्याकडे संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. स्पर्धेतील सर्वात महत्त्वपूर्ण समजल्या जात असलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या लढतीसाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला असून, शुभमन गिलचं पुनरागमन संघात झालं आहे. तर इशान किशनला वगळण्यात आलं आहे.
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, दोन्ही संघांनी आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सवर आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला होता. तर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात केली आहे.
दरम्यान, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील इतिहास पाहिल्यास भारतीय संघाने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं आहे. १९९२ मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव केला होता. पुढे १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ मध्येही ही विजयी परंपरा कायम राहिली. आता आजही भारतीय क्रिकेटप्रेमींना अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तानचा संघ - अब्दुल्लाह शफिक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.