यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फायनलपेक्षा सर्वाधिक हाय व्होल्टेज मॅच म्हणजे भारत-पाकिस्तानची होणारी टक्कर. या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तानची मॅच 16 जूनला होणार आहे. हा सामना कोण जिंकेल याची उत्सुकता असतानाच भारतासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाच्या चाहत्यांनी या सामन्याआधीच पाकिस्तानवर मात केली आहे.
वर्ल्डकप 2019 मध्ये 16 जूनला हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. भारत - पाकिस्तानच्या सामन्यांना होळी-दिवाळसणासारखे स्वरूप असताना यंदाचा हा सामना खास असणार आहे. कारण पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेला बालाकोट एअर स्ट्राईक आणि त्यांनंतर भारतीय सीमेत घुसलेल्या पाकच्या एफ 16 विमानांना हुसकावून लावल्याने दोन्ही देशांमधील वातावरण कमालीचे भारावलेले आहे. या पार्श्वभूमीवर हा सामना होणार असल्याने भारतीय संघाबरोबरच चाहतेही 'जोश' मध्ये असणार आहेत.
भारतीय संघाच्या चाहत्यांनी या मैदानावरील एकूण तिकीटपैकी तब्बल 66.6% तिकिटे खरेदी केली आहेत. तर पाकिस्तानच्या चाहत्यांना केवळ 18.1 टक्केच तिकिटे मिळाली आहेत. यामुळे मैदानावर आवाज कोणाचा, तर भारतीयांचाच अशी घोषणा दुमदुमली तर नवल वाटायला नको.
याशिवाय भारत आणि यजमान इग्लंडदरम्याने होणाऱ्या 30 जूनच्या सामन्याची तिकिटेही भारतीय चाहत्यांनीच जास्त खरेदी केली आहेत. भारताने 55 टक्के आणि इग्लंडच्या प्रेक्षकांना 42 टक्के तिकिटे मिळाली आहेत. महत्वाचे म्हणजे क्रिकेट सामन्यांची तिकीटे काळ्या बाजारात 50 हजार रुपयांना मिळत आहेत.