नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. यूएईच्या धरतीवर सुरू असलेली ही स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. रविवारी झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने जोरदार कमबॅक करून सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला मात्र विजय मिळवण्यात अपयश आले. शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानने 1 चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. मात्र भारतीय संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) आसिफ अलीचा झेल सोडला त्यामुळे त्याला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, अनेक आजी माजी भारतीय खेळाडूंनी अर्शदीप सिंगची पाठराखण केली होती. मात्र हा वाद आणखीच चिघळला असून अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पेजवर बदल करण्यात आला असून 'खलिस्तानी' म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच खलिस्तानी कनेक्शन असल्याचा दाखला देण्यात आला आहे. आता या प्रकरणी भारत सरकार सक्रिय झाले असून माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विकिपीडियाला नोटीस पाठवली आहे.
सरकारने घेतली दखलआयटी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पेजवर खलिस्तानच्या समर्थनार्थ असल्याचा दावा करण्यात आला आहे. एखाद्या खेळाडूला अशा प्रकारे संबोधल्यास देशातील वातावरण बिघडू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय अर्शदीप सिंगच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हा धोका असू शकतो असे बोलले जात आहे.
17 व्या षटकात सुटला होता झेलभारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की चर्चेला उधान येत असते. मात्र रविवारी झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्याच्या 17 व्या षटकात अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या आसिफ अलीचा सोप्पा झेल सोडल्याने त्याच्यावर पातळी सोडून टीका केली जात आहे. आसिफ अलीने झेल सुटल्याचा फायदा घेत चौकार आणि षटकार मारला. त्यामुळे नेटकऱ्यांनी अर्शदीप सिंगवर निशाणा साधण्यास सुरूवात केली.