Zaka Ashraf, India vs Pakistan in ODI World Cup 2023: वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ नुकताच भारतात दाखल झाला. सुरुवातीला पाकिस्तानच्या संघाला व्हिसा नाकारण्यात आला होता. अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर बुधवारी पाकिस्तानी संघ भारतात पोहोचला. पाकिस्तानचा संघ तब्बल सात वर्षांनंतर भारतात आला. 2016 मध्ये टी-20 वर्ल्ड कपदरम्यान पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. पाकिस्तानी संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे खेळाडूंनाही आनंद झाला. भारतात पाकिस्तानी खेळाडूंना मिळालेले प्रेम पाहून ते भारावून गेले. पण असे असतानाच, पीसीबी प्रमुख झका अशरफ यांनी भारताला शत्रू राष्ट्र म्हटल्याने खळबळ माजली. विशेष म्हणजे त्यांना या विधानामुळे पाकिस्तानी लोकांकडूनच टीकेचा सामना करावा लागला.
पाकिस्तान नेहमीच बेताल वक्तव्यांसाठी ओळखला जातो. एकीकडे पाकिस्तानी खेळाडू भारतातील सुविधा आणि आदरातिथ्याने खूश आहेत, तर दुसरीकडे पीसीबीचे प्रमुख झका अशरफ यांनी भारताला शत्रू देश असल्याचे म्हटले. झका अशरफ यांनी मीडियाशी संवाद साधत पाकिस्तानी खेळाडूंच्या वाढलेल्या पगाराबद्दल भाष्य केले. तसेच, ते म्हणाले की, "प्रेमाने आम्ही खेळाडूंना इतके पैसे दिले आहेत, कदाचित इतिहासात कधीच खेळाडूंना इतके पैसे मिळाले नसतील. आमच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले पाहिजे हाच माझा उद्देश होता. ते कोणत्याही शत्रू देशात किंवा स्पर्धा आयोजित केलेल्या कोणत्याही ठिकाणी गेल्यास त्यांना चांगली कामगिरी करता, यावी यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे."
आपल्या खेळाडूंचे भारतात झालेले स्वागत पाहून पाकिस्तानी चाहत्यांना विश्वास बसला नाही. त्यामुळे ते देखील झका अश्रफ यांच्या वक्तव्याचा निषेध करताना दिसले. सोशल मीडियावरील पाकिस्तानी चाहते त्यांच्या बोर्ड अध्यक्षांच्या विधानामुळे नाराज असल्याचेही जाणवले.
--
--
--
दरम्यान, विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघ आज सराव सामना खेळणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्यात चाहत्यांना प्रवेश दिला जाणार नाही. याच मैदानावर पाकिस्तानचा दुसरा सामना ३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. विश्वचषकातही पाकिस्तानचे पहिले दोन्ही सामने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.