India Vs Pakistan World cup 2023 Stats, Records: शनिवार १४ ऑक्टोबर २०२३, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक ब्लॉकबस्टर सामना खेळला जाणार आहे. या दोन्ही संघांमध्ये हेड-टू-हेड सामन्यांचा विचार केला तर, पाकिस्तानने वन डे आणि कसोटी सामन्यांमध्ये भारताविरुद्ध अधिक सामने जिंकले आहेत, तर ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा सर्वश्रुत आहे. ट्वेंटी-२० आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने १३-१ अशा फरकाने पाकिस्तानविरुद्ध मजबूत आघाडी घेतली आहे. २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने एकमेव विजय मिळवला होता आणि भारताचा सलग १२ विजयांची मालिका खंडित केली होती. यासाठी त्यांना २९ वर्षांची वाट पाहावी लागली.
टीम इंडियाने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. भारताने २७ वेळा २००+ धावांचा टप्पा गाठला आहे, तर पाकिस्तानी संघ केवळ ११ वेळा हा टप्पा पार करू शकला आहे.
टीम इंडिया हा एकमेव आशियाई संघ आहे ज्याने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत केले. भारताने हा पराक्रम सलग दोनदा केला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८-१९ मध्ये मालिका जिंकली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली २०२०-२१ मध्ये कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर ते ऑस्ट्रेलियात एकदाही कसोटी मालिका जिंकू शकलेले नाही.