पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाने संघात एक बदल केला असून, डेंग्युवर मात करणाऱ्या शुभमन गिल याला या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. तर पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मासोबत सलामीला येणाऱ्या इशान किशनला वगळण्यात आलं आहे.
भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवणाऱ्या संघात फार मोठे फेरबदल करणे टाळले आहे. डेंग्यूचा संसर्ग झाल्यामुळे शुभमन गिल ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. दरम्यान, शुभमन गिल फिट झाला असून, तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ९९ टक्के खेळेल, असं सांगत रोहित शर्माने कालच त्याच्या संघातील समावेशाबाबत सकारात्मक संकेत दिले होते. शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये असून, आशिया चषक तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत त्याने शानदार कामगिरी केली होती.
दरम्यान, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, दोन्ही संघांनी आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सवर आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला होता. तर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात केली आहे.