India vs Pakistan Shaheen Shah Afridi: भारतीय संघाला २०२१ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने भारताच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यानंतर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडलं. त्यामुळे भारताला १० विकेट्सने लाजिरवाणी हार पत्करावी लागली. आता २०२२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतही भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात जर हॅटट्रिक घ्यायची असेल, तर त्यात तीन फलंदाज कोणते असावेत? असा प्रश्न शाहीन शाह आफ्रिदीला विचारण्यात आला होता.
शाहीन शाह आफ्रिदी एका क्रिकेट वेबसाईटशी संवाद साधत होता. त्यावेळी त्याला विविध प्रश्न विचारण्यात आले. विराट कोहलीची विकेट ही मला सर्वात मौल्यवान वाटते असं उत्तर त्याने एका प्रश्नाला दिलं होतं. त्यानंतर त्याला विचारण्यात आलं की भारताविरूद्ध हॅटट्रिक घ्यायची असेल तर ते तीन खेळाडू कोणते असावेत असं तुला वाटतं? त्यावर त्याने लगेच उत्तर दिलं, "रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल." २०२१ च्या विश्वचषकात त्याने भारताविरूद्ध हेच तीन बळी घेतले होते. रोहितला त्याने पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं, राहुलही स्वस्तात बाद झाला होता. पण विराटला झटपट बाद करणं त्याला जमलं नव्हतं.
दरम्यान, २०२१ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. पण पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद केले. रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर शून्यावर तर केएल राहुल ३ धावांवर माघारी परतला. विराट कोहली आणि ऋषभ पंत या जोडीने संघाला सावरलं. पंतने ३९ तर विराटने ५७ धावा केल्या. त्याचीही एकाकी झुंज शाहीन शाह आफ्रिदीनेच संपवली. त्यानंतर १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी संघाला सामना जिंकवून दिला. मोहम्मद रिझवानने नाबाद ७९ तर कर्णधार बाबर आझमने नाबाद ६८ धावा केल्या.