India vs South Africa 1st test: भारतीय संघाची दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरूवात विजयाने झाली. पाचव्या दिवशी रंगतदार स्थितीत असलेल्या पहिल्या कसोटीत भारताने आफ्रिकेला ११३ धावांनी पराभूत केलं आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचा हा सेंच्युरियनच्या मैदानावरील पहिलाच विजय ठरला. महत्त्वाची बाब म्हणजे, एखाद्या आशियाई संघाने दक्षिण आफ्रिकेला सेंच्युरियनच्या मैदानावर पहिल्यांदाच पराभूत केलं. या विजयासोबतच भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघालाही एका बाबतीत मागे टाकले.
भारतीय संघाने २०२१ या वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाविरूद्ध एक कसोटी सामना जिंकला. त्यानंतर इंग्लंड विरूद्ध तीन कसोटी सामने जिंकले. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा सामना भारताला गमवावा लागला, पण त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरही भारताने दोन कसोटी जिंकल्या. आणि न्यूझीलंड विरूद्ध एक कसोटी सामना जिंकला. त्यातच वर्षाच्या अखेरीस भारताने आफ्रिकेला पराभूत केले. त्यामुळे भारताने एका वर्षात ८ कसोटी विजय मिळवले. २०२१ या वर्षभरात पाकिस्तानने सर्वाधिक ७ कसोटी विजय मिळवले होते. त्यांना मागे टाकत भारताने यंदाच्या वर्षी बाजी मारली.
असा रंगला भारत-आफ्रिका पहिला सामना
भारताने पहिल्या डावात घेतलेल्या १३० धावांच्या आघाडीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात आफ्रिकेने मार्करम (१), पीटरसन (१७), डुसेन (११) आणि महाराज (८) असे चार फलंदाज गमावले. पाचव्या दिवशी सुरुवातीच्या अर्ध्या तासात त्यांनी संयमी खेळ केला होता. पण नंतर कर्णधार डीन एल्गर ७७ धावा काढून बाद झाला. अनुभवी क्विंटन डी कॉकदेखील २१ धावांवर माघारी परतला. अखेरीस मुल्डर (१), जेन्सन (१३), रबाडा (०) आणि एन्गीडी (०) यांना झटपट बाद करत भारताने सामन्यात बाजी मारली.