इस्लामाबाद - मेलबर्नमधील ऐतिहासिक एमसीजीच्या मैदानावर झालेल्या अत्यंत उत्कंठावर्धक लढतीत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर मात केली. दरम्यान, या सामन्यानंतर भारतात विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. तर शेजारील पाकिस्तानमध्ये पराभवावरून शिमगा सुरू झाला आहे. विराट कोहलीने केलेली तुफानी फटकेबाजी आणि हार्दिक पांड्याने त्याला दिलेली सुरेख साथ यामुळे भारतीय संघाने हा रोमहर्षक विजय मिळवला. मात्र आता पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी या पराभवाचं खापर शेवटच्या षटकात पंचांनी दिलेल्या नोबॉलवर फोडण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. मात्र विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. पण शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना हार्दिक पांड्या बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या दिनेश कार्तिकने एकेरी धाव घेत विराट कोहलीला स्ट्राइक दिली. पुढच्या चेंडूवर विराट कोहलीने दोन धावा घेतल्या. त्यामुळे आता ३ चेंडूत १३ धावा असं समीकरण सामन्यात तयार झालं. मोहम्मद नवाजने टाकलेल्या पुढच्या फुलटॉस चेंडूवर विराटने षटकार चढवला. कंबरेच्या वर आलेला हा चेंडू पंचांनी नोबॉल ठरवल्याने भारताला षटकारासह एकूण सात धावा मिळाल्या आणि सामन्याचे चित्र पालटले.
पंचांच्या या निर्णयावरून पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पंचांशी हुज्जत घातली. मात्र पंच निर्णयावर कायम राहिले. आता पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींकडून पंचांचा हाच निर्णय संघाच्या पराभवाचे कारण ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच ट्विटरवरही नोबॉल ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यावरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दुसरीकडे भारतीय संघाने मिळवलेल्या रोमहर्षक विजयामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी उत्साहित आहेत. तसेच त्यांच्याकडून संघाचं अभिनंदन करण्यात येत आहे.