Join us  

"आता अजून काय पाहिजे..."; भारत-पाक सामन्यावर शोएब अख्तरची बोलकी प्रतिक्रिया

भारताने पाकिस्तानला तब्बल २२८ धावांनी केलं पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 10:21 AM

Open in App

IND vs PAK, Asia Cup 2023 : आशिया कप 2023 च्या सुपर 4 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव केला. संपूर्ण सामन्यात असा एकही प्रसंग आला नाही की जिथे पाकिस्तान भारताच्या पुढे आहे असे वाटले. भारताने प्रथम फलंदाजीत पाकिस्तानचा पराभव केला आणि नंतर गोलंदाजीत त्यांचे कंबरडे मोडले. भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. हा एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तानवर टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय ठरला. या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर भारतीय संघातील खेळाडूंचे कौतुक केले. आपल्या संघाच्या पराभवाबाबतही त्याने रोखठोक मत मांडले.

शोएब अख्तरने जसप्रीत बुमराहचे तोंडभरून कौतुक केले. जेव्हा शोएबला विचारण्यात आले की बुमराह आणि सिराजच्या सुरुवातीच्या स्पेलने सामन्याचा टोन सेट केला का? यावर शोएब म्हणाला की, ही गोष्ट अगदी योग्य आहे. मला बुमराहचा फिटनेस बघायचा होता आणि मी बुमराहला पाहिलं. मला आता तो परिपूर्ण वाटतं. त्याचे मनगट योग्यप्रकारे फिरत होते. अॅक्शन फॉलो थ्रू पूर्णपणे जात होती, आता अजून काय हवंय... सामन्याचा सराव झाला. 300-350 धावा बोर्डवर आहेत. अशा वेळी मुक्तपणे गोलंदाजी करणं हेच खरं जरूरीचं असतं. शरीरावर कोणतेही दडपण नसताना बुमराहने शिस्तबद्ध गोलंदाजी केली. याशिवाय मोहम्मद सिराजनेही दमदार गोलंदाजी करत बुमराहला चांगली साथ दिली.

शोएब अख्तरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये अख्तरने टीम इंडियाचे कौतुक केले. तो म्हणाला की, भारताचे खूप अभिनंदन, भारत खूप चांगला खेळला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत भारताने पाकिस्तानचा धोबीपछाड दिला.

असा रंगला सामना

प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकात 2 बाद 356 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने सर्वाधिक १२२ तर केएल राहुलने १११ धावांची खेळी केली. 357 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 128 धावांत आटोपला. टीम इंडियासाठी कुलदीप यादवने २५ धावांत ५ बळी मिळवले.

टॅग्स :एशिया कप 2023विराट कोहलीरोहित शर्माशोएब अख्तरपाकिस्तान