दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : महेंद्रसिंग धोनीकडे सध्या भारताचे कर्णधारपद नाही, पण तरीही तो संघातील दुसरा कर्णधार आहे, हे साऱ्यांनाच माहिती आहे. या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या रविवारच्या सामन्यातही आहे. या अनुभवानंतर DRSला म्हणतात धोनी रीव्ह्यू सिस्टीम म्हणतात का, असे चाहत्यांना वाटायला लागले.
भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांनी सुरुवातीला अचूक मारा केला. त्यांनी धावांना वेसण घातली असली तरी त्यांना बळी मिळवता आला नव्हता. त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती चेंडू सुपूर्द केला.
आठव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चहलने पायचीतची अपील केली. त्यावेळी इमाम उल हक फलंदाजी करत होता. ही अपील पंचांनी नाकारली. त्यावेळी DRS घ्यायचा की नाही, याबाबत संभ्रम होता. रोहित आणि चहल आणि धोनीला विचारणा केली आणि धोनीने तात्काळ DRS घ्यायला सांगितले. तिसऱ्या पंचांनी तो चेंडू पुन्हा एकदा पाहिला आणि इमाम बाद असल्याचे सांगितले. मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलला आणि इमामला बाद घोषित केले. त्यावेळी भारतीय संघातील प्रत्येकाने धोनीचे आभार मानले. कारण धोनीने DRS घ्यायला सांगितला नसता तर इमाम बाद झाला नसता. त्यामुळेच DRS म्हणजे धोनी रीव्ह्यू सिस्टीम आहे, असे आता वाटायला लागले आहे.