नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) चे लवकरच बिगुल वाजणार आहे. २७ ऑगस्ट पासून रंगणाऱ्या या स्पर्धेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या बहुचर्चित स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. भारत-पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना होणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण येत असते. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या खेळीकडे तमाम भारतीयांचे लक्ष असणार आहे. मात्र पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) सांगितल्यानुसार पाकिस्तानच्या गोलंदाजांना वेगळ्याच फलंदाजाची धास्ती आहे.
दरम्यान, बहुचर्चित सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार आणि महान गोलंदाज वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंबद्दल भाष्य केले आहे. तसेच पाकिस्तानी खेळाडूंना चितपट करू शकतील अशा खेळाडूंची भारतीय संघात निवड करावी असा सल्लाही त्याने दिला आहे. संघातील खेळाडूंपैकी रोहित, कोहली आणि के.एल राहुलसह अक्रमने सूर्यकुमार यादवला आवडता आपला खेळाडू म्हणून निवडले आहे. अर्थातच तो सूर्यकुमारला पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका मानत आहे.
भारताच्या 'सूर्या'ची पाकिस्तानला धास्ती
सूर्यकुमार यादवने मार्च 2021 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले आणि तेव्हापासून तो भारताच्या फलंदाजीचा प्रमुख चेहरा बनला आहे. अक्रमने आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघात असताना सूर्यकुमार यादवसोबत काम केले होते. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत अक्रमने म्हटले, "सूर्यकुमारमध्ये आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. रोहित शर्मा, के.एल राहुल आणि विराट कोहली हे जरी भारतीय संघात असले तरी सूर्यकुमार माझा आवडता खेळाडू आहे. जेव्हापासून तो भारतीय संघात आला तेव्हापासून त्याची खेळी आणखीच सुधारली आहे. मला वाटते की तो फिरकी किंवा वेगवान गोलंदाजांविरुद्ध अतिशय धोकादायक खेळाडू आहे आणि तो खरोखर 360-डिग्रीचा खेळाडू आहे."
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.
Web Title: IND vs PAK Suryakumar Yadav is one of the most dangerous players in the world, says Wasim Akram
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.