IND vs PAK T20 WC : भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना अवघ्या काही तासांवर आला आहे... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच चाहते ९ जूनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अखेर उद्या न्यूयॉर्कमध्ये INDvsPAK हा सामना होणार आहे. यापूर्वी २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अविश्वसनीय खेळीने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली होती आणि उद्याच्या सामन्यात विराटकडून चाहत्यांना पुन्हा त्या मॅजिकल खेळीची अपेक्षा आहे. पण, कर्णधार रोहित शर्माचे ( Rohit Sharma) म्हणणे काही वेगळे आहे.
भारताने आयर्लंडवर विजय मिळवून स्पर्धेत चांगली सुरुवात केली, परंतु पाकिस्तानला त्यांच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे, परंतु रोहितला असे वाटत नाही. तो म्हणाला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये तुम्ही वर्तमानात कसे खेळता हे महत्त्वाचे आहे. हा खेळ लगेच बदलणारा आहे. २०२२मध्ये ते झिम्बाब्वेकडून हरले होते, परंतु त्यांनी फायनलमध्ये धडक दिली होती. मला वाटते की आपण चांगले क्रिकेट खेळले पाहिजे. परिस्थिती काय आहे, याबद्दल आम्ही विस्ताराने बोललो आहोत. प्रत्येकाला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागतो. चांगले निर्णय घ्यावे लागतील. यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही पहिल्या सामन्यात जसा पध्दत बाळगला होता त्याच पद्धतीने आम्ही पुढे जाऊ.
''खेळपट्टी आम्ही हाताळू, हा एक आंतरराष्ट्रीय आव्हानांचा भाग. गाब्बामध्ये आम्ही कोणत्या प्रकारच्या खेळपट्टीचा सामना केला, ते लक्षात ठेवा. जिथे आम्ही चेंडू शरीरावर झेलले. वर्ल्ड कपपेक्षा मोठे काहीही असू शकत नाही आणि तुम्ही शरीरावर कितीही आघात झेलाल ते कमीच आहेत. आम्ही पाकिस्तानविरुद्ध अलिकडच्या काळात खेळलो आहोत, पूर्वी जिथे दर चार वर्षांनी एक सामना व्हायचा. आपण खूप पुढे विचार करू शकत नाही. प्रत्येक षटकात खेळ बदलतो,''असेही रोहित म्हणाला.
विराट बद्दल विचारल्यावर रोहितने सांगितले की, आम्ही कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून राहणार नाही. संपूर्ण संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. विराटने बांगलादेशविरुद्धचा सराव सामना खेळला नसला तरी त्याने पुरेसा सराव केला आहे. जगभर खेळून त्याला ज्या प्रकारचा अनुभव आला, त्याबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही.