IND vs PAK, T20 World Cup: भारतीय संघाचा पाकिस्तान विरूद्धचा टी२० विश्वचषकातील सलामीचा सामना अतिशय रोमांचक झाला. १६० धावांचे आव्हान टीम इंडियाने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. मात्र सामन्यात अनेक वेळा अशी परिस्थिती होती, ज्यावेळी सामना कोणत्याही संघाच्या दिशेने झुकणे शक्य होते. भारताची खराब सुरूवात झाल्यानंतर, माजी कर्णधार विराट कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने सामन्यात विजय मिळवला. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वशैलीवरुन त्याच्यावर टीका करण्यात आली.
भारतीय संघाने ३१ धावांत आपले ४ गडी गमावले होते. पण त्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी ११३ धावांची भागीदारी करत सामना पाकिस्तानपासून दूर नेला. पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला, यावरून बाबरच्या कॅप्टन्सीबाबत टीका झाली. "बाबर आझमची कप्तानी म्हणजे जणू एखादी पवित्र गाय आहे, जिच्यावर टीका केली जाऊ शकत नाही. सलग तिसऱ्यांदा बाबर आझमच्या कप्तानीमधील चुकांमुळे पाकिस्तानला फटका बसला आहे. पण आपल्याला केवळ हेच ऐकायला मिळते की, तो ३२ वर्षांचा होईपर्यंत तो कर्णधार म्हणून परिपूर्ण झालेला असेल," अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद हाफीज याने बाबरवर टीकास्त्र सोडले.
"भारताविरूद्धच्या सामन्यात ७ ते ११ या षटकांमध्ये टीम इंडियाचे फलंदाज एका षटकात ४ धावा मिळवण्यासाठीही धडपडताना पाहायला मिळत होते. मग, त्याच वेळेत बाबर आझम स्पिन गोलंदाजांचा कोटा पूर्ण का केला नाही?" असा सवाल हाफीजने विचारला.
"पाकिस्तानच्या गोलंदाजांनी खरंच खूप चांगली कामगिरी केली. कोहली आणि पांड्या यांना नक्कीच श्रेय द्यायला हवे. नव्या चेंडूने खेळणे फारसे सोपे नव्हते. पाकिस्तानच्या डावात १० षटकांनंतर भागीदारी झाली. तेव्हा पाककडे संधी होती. गोलंदाजीबाबत पाकिस्तानचा संघ आखलेल्या रणनितीप्रमाणे खेळला. पण विराटला फलंदाजीचे श्रेय द्यायलाच हवे. मधल्या टप्प्यात पाकिस्तानचा संघ विकेट्स काढण्यासाठी आग्रही दिसला, त्यामुळे स्पिनर्सची षटके शिल्लक राहिली, त्याचाच फटका शेवटी संघाला बसला," असेही हाफीजने स्पष्ट केले.