मेलबर्न - आज झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमहर्षक लढतीनंतर विराट कोहलीच्या तुफानी खेळीचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. जागतिक क्रिकेटमध्ये बाबर आझमची तुलना नेहमीच विराट कोहलीशी केली जाते. दोघेही क्रिकेटमधील अग्रगण्य खेळाडू आहेत. मात्र आज विराट कोहलीने एमसीजीवर असा काही खेळ केला की, त्याच्या वादळासमोर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम हासुद्धा नतमस्तक झाला. विराट कोहलीने या सामन्यात सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५२ चेंडूत ८२ धावा कुटून काढल्या. त्यामुळे सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला.
दरम्यान, विराट कोहलीच्या या खेळीचं कौतुक करताना बाबर आझमम म्हणाला की, आमच्या गोलंदाजांनी पहिला १० षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी ज्या प्रकारे सामना सांपवला, त्याचं श्रेय त्यांना जातं. विराट कोहलीने आज त्याच्या कौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण सादर केलं. हा एक रोमांचक सामना होता आणि प्रेक्षकांनी त्याचा मनसोक्त आनंद लुटला.
बाबर आझम पुढे म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यामध्ये अतिरिक्त दबाव हा नेहमीच असतो. तुम्ही जेवढ्या लवकर या दबावातून बाहेर पडता तेवढं चांगलं असतं. म्हणूनच विराट हा मोठा खेळाडू आहे. त्याच्यावर दबाव होता. मात्र त्याने त्यावर मात करत डाव सावरला. त्याने ज्याप्रकारे भागीदारी केली, ती सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरली. या खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल, असेही बाब आझमने सांगितले.
आज झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे चार फलंदाज झटपट बाद झाले होते. मात्र नंतर विराट कोहलीने हार्दिक पांड्याच्या साथीने डाव सावरताना भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते.