Rohit Sharma, IND vs PAK: टीम इंडियाने पाकिस्तान विरूद्धचा T20 World Cup 2022 मधील सलामीचा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली होती, पण हार्दिक पांड्याच्या साथीने माजी कर्णधार विराट कोहलीने अप्रितम फलंदाजी केली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. शेवटच्या षटकात हार्दिक बाद झाल्यानंतरही विराटने शेवटपर्यंत झुंज देत, भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला फारशी चमक दाखवता आली नाही. तो ७ चेंडूत ४ धावा करुन माघारी परतला. पण असे असले तरी त्याने 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी२० विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यातच इतिहास रचला. हा सामना रविवारी (२३ ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध झाला. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही या सामन्यात मोठी कामगिरी केली. रोहित शर्मा टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला. या यादीच त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. रोहितचा पाकिस्तानविरुद्धचा सामना हा टी२० विश्वचषकातील ३४वा सामना होता. धोनीने मात्र टी२० विश्वचषकात एकूण ३३ सामने खेळले होते.
जागतिक फलंदाजांच्या यादीत रोहित दिलशानच्या मागे
जगभरातील फलंदाजांमध्ये पाहिल्यास, टी२० विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत रोहित संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यासोबत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि शोएब मलिक यांच्यासह वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आहे. या चौघांनीही ३४-३४ सामने खेळले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशान अव्वल स्थानावर आहे. त्याने ३५ टी२० सामने खेळले. तर विश्वचषकात ३१ टी२० सामने खेळणारा माजी अष्टपैलू युवराज सिंग हा यादीत पाचव्या स्थानी आहे.