Join us  

Shahid Afridi, IND vs PAK: आधी जावयाची धुलाई, मग Virat Kohli चा सिक्सर... पराभवानंतर आफ्रिदीचा रडीचा डाव

भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:57 PM

Open in App

Shahid Afridi, IND vs PAK: भारताविरुद्ध झालेला पराभव पाकिस्तानला कधीच पचनी पडला नसल्याचा क्रिकेटचा इतिहास आहे. T20 World Cup 2022 मध्ये २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये झालेल्या पराभवानंतरही असेच घडले. भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने मात केली. पण, तो पराभव स्वीकारण्याऐवजी काही पाकिस्तानी फॅन्स आणि माजी क्रिकेटपटूंनी भारताच्या विजयाबद्दल, पंचांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सामन्याच्या शेवटच्या षटकातील नो-बॉल वर चर्चा करून पाकिस्तानी फॅन्सने त्यावरून आवाज उठवला. या नो-बॉलबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही मत मांडले आणि थेट अंपायरिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नक्की काय घडला होता प्रकार

भारतीय डावातील शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूशी संबंधित हे प्रकरण घडले. हा चेंडू टाकेपर्यंत सामना पाकिस्तानच्या हातात होता. भारताला ३ चेंडूत १३ धावा हव्या होत्या. पण त्यानंतर जे झाले, तेथून पाकिस्तानच्या हातून भारताने विजय हिसकावून घेतला. भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात भारताला ३ चेंडूत १३ धावा करायच्या होत्या. चेंडू टाकत असलेल्या मोहम्मद नवाजने ओव्हरचा चौथा चेंडू टाकला, ज्यावर विराट कोहलीने षटकार मारला, मात्र षटकार मारल्यानंतर त्याने स्क्वेअर लेग अंपायरकडे नो बॉलची मागणी केली. स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या इरास्मसने चेंडूची उंची पाहून थर्ड अंपायरला न विचारता त्याला नो बॉल दिला. इथेच पाकिस्तानचे समीकरण बिघडले. त्यानंतर भारताला ३ चेंडूत ६ धावा करायच्या होत्या. त्या भारताने सहज केल्या. पण, या एका नो बॉलवरुन पाकिस्तानी आजी माजी खेळाडू आणि फॅन्स भडकले.

आफ्रिदी काय म्हणाला?

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वासिम अक्रम, वकार युनूस यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. सामन्यात शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन शाह आफ्रिदी याची पक्की धुलाई झाली. तशातच नंतर पाकिस्तान सामना हरला. त्यामुळे अंपायरवर निशाणा साधताना शाहिद आफ्रिदीने रोखठोक मत व्यक्त केले. शाहिद आफ्रिदी म्हणाला, "सामन्यात जे अंपायर असतात, त्यांनी दिलेला निर्णय अंतिम असतो हे खरे आहे. पण मैदान खूप मोठे असते. त्यामुळे अशा वेळी अंपायरला देखील गरुडाची नजर नसते. त्यांच्याकडूनही काही गोष्टी सुटू शकतात आणि चुका होऊ शकतात. त्यामुळे त्या नो बॉलच्या वेळी अंपायरने थेट निर्णय घेण्याऐवजी थर्ड अंपायरची मदत घेतली असती तर ते योग्य ठरलं असतं."

"जेव्हापासून थर्ड अंपायर हा खेळाचा एक भाग झाला आहे, तेव्हापासून मैदानावरील अंपायर बऱ्याच वेळा थर्ड अंपायरची छोट्या गोष्टींसाठी मदत घेत असतात. बरेच रन आऊट थर्ड अंपायरकडूनच दिले जातात. भारत-पाक सामन्यातील हा एक निर्णायक क्षण होता. तिथे थर्ड अंपायरची मदत घेतली जायला हवी होती. तो चेंडू नो-बॉल होता की नाही हे थर्ड अंपायरने तुम्हाला नक्कीच सांगितले असते. पण, मैदानावरील अंपायरने लगेच नो-बॉलचा इशारा दिला, हे चुकीचे आहे," असेही आफ्रिदी म्हणाला. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानशाहिद अफ्रिदीविराट कोहली
Open in App