India vs Pakistan, T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान यांच्यात मेलबर्नवर सुपर संडेला थरार पाहायला मिळाला... भारतीय संघाची झालेली पडझड पाहून आता काही खरं नाही असेच वाटले. अखेरच्या १० षटकांत ११५ धावा करायच्या होत्या आणि शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह हा जलजगती मारा करणारा तोफगोळा समोर होता. पण, विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीनं चतुराईने भारताला विजय मिळवून दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११३ धावा जोडल्या आणि पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला. या सामन्यानंतर दोन सुपर स्टार खेळाडूंनी एकमेकांशी कॅनडीड गप्पा मारल्या. यावेळी, मी तुझ्यासाठी गोळी खाल्ली असती, पण तुला बाद होऊ दिले नसते, असे विधान हार्दिकने विराटसाठी केले. भारताने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
ॲशने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... माझं नाही ऐकलं! ६ चेंडूंत काय घडलं, विराट कोहलीनं सांगितलं
शान मसूद ( ५२*) व इफ्तिखार अहमद ( ५१) यांच्या खेळीने पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंग ( ३-३२) व हार्दिक पांड्या ( ३-३०) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. हार्दिकने एका षटकात दोन विकेट्स घेत खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी दिली. प्रत्युत्तरात लोकेश राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल हे ३१ धावांवर माघारी परतले. हार्दिक ( ४०) व विराट कोहली ( ८२*) यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला अन् भारताचा विजय पक्का केला. ३१ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली व हार्दिक पांड्या यांनी जो खेळ केला, त्याला तोड नाही.
''त्याक्षणी मी तुझ्यासाठी गोळी खाल्ली असती, परंतु तुला बाद होऊ दिले नसते. माझं ध्येयं सोपं होत आणि ते म्हणजे त्याक्षणी तुझा मार्ग सुकर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचा. तेच मी केले. तणाव कसा हाताळायचा हे तुझ्यापेक्षा अधिक कोण जाणू शकत नाही आणि ते तू अनेकदा करून दाखवले आहेस,''असे हार्दिक BCCI ने पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हणतोय.
४ बाद ३१ धावा अशी दयनीय अवस्था असताना विराट व हार्दिक ही जोडी मैदानावर उतरली. हॅरीस रौफने टाकलेल्या १९व्या षटकात विराटने मारलेल्या दोन सलग षटकारांचे हार्दिकने कौतुक केले.'' विराट कोहलीने मारलेले ते दोन फटके हे सुपर्ब होते. त्या दोन फटक्यांचं महत्त्व मी जाणून होतो. त्यापैकी एक जरी फटका चुकला असता तर पाकिस्तानच्या हातात सामना राहिला असता,''असे हार्दिक म्हणाला.
पाहा मुलाखत...
विराटनेही ते दोन षटकार हे खूप स्पेशल असल्याचे मान्य केले. त्या महत्त्वाच्या क्षणी विराटने ज्या पद्धतीने ते षटकार खेचले हे दुसऱ्याला जमले नसते, असे हार्दिक म्हणाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"