महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघानं तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानच्या संघ पराभव केला. भारतानं विश्वचषक स्पर्धेत १५० धावांचा पाठलाग करून विजय मिळवत इतिहास रचला. पाकिस्तानच्या संघानं भारतीय संघाला १५० धावांचं लक्ष्य दिलं होतं. राधा यादवनं ४ षटकांमध्ये २१ धावा देत सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. जमिमा रॉड्रीक्स आणि रिचा घोष यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना लोळवत ७ विकेट्सनं विजय मिळवून दिला.
पाकिस्ताननं भारतीय संघाला १५० धावांचं लक्ष्य दिलं होतं. याचा पाठलाग करताना सुरुवातीला शेफाली वर्मानं २५ चेंडूंमध्ये चार चौकारांसह ३३ धावा केल्या. तर साना सादिकच्या चेंडूवर फातिमा सानानं झेल घेत यास्तिका भाटियाला १७ धावांवर माघारी धाडलं. तर कर्णधार हरमनप्रित कौरलाही १२ धावांवर समाधान मानावं लागलं. पण दुसरीकडे जमिमा रॉड्रीक्सनं पाकिस्तानच्या फलंदाजांची तुफान धुलाई करत ५३ धावा ठोकल्या. तर रिचा घोषनेही तिला जबरदस्त साथ देत ३१ धावा केल्या.
सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून पाकिस्ताननं फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात दीप्ती शर्मानं जवेरिया खानला ८ धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर पाकिस्तानची कर्णधार बिस्माहनं डाव सावरला तिनं ५५ चेंडूंचा सामना करत ७ चौकारांसह ६८ धावा ठोकल्या. मुबिना अलीलला राधा यादवनं अवघ्या १२ धावांवर बाद केलं. तर निदा दारला भोपळाही फोडता आला नाही. आएशा नदीमनं कर्णधार बिस्माह मरुफच्या साथीनं पाकिस्तानच्या संघाला १४९ धावांपर्यंत पोहोचवलं.
स्मृती मानधनाची माघारदरम्यान,स्मृती मानधनाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्याच्यावेळी बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. लक्षणीय बाब म्हणजे दुखापतीच्या कारणास्तव स्मृती मानधना पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातूही बाहेर झाली होती.