मेलबर्न - टी-२० वर्ल्डकपमध्ये आज झालेल्या अत्यंत रोमहर्षक लढतीत टीम इंडियाने पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याचा भेदक गोलंदाजीनंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने केलेली शतकी भागीदारी या विजयात निर्णायक ठरली. टीम इंडियाच्या या विजयानंतर देशभरात जोरदार आनंदोत्सव साजरा होत आहे. यादरम्यान, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरलं आहे. तसेच त्यांचा व्हिडीओही आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील लढत अत्यंत उत्कंठावर्धक अशीच झाली. त्यातच सामन्याचा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचल्याने ही उत्कंठा अधिकच वाढली होती. दरम्यान, शेवटच्या चेंडूवर अश्विनने चौकार मारला आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. दरम्यान, वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनसाठी ऑस्ट्रेलियात गेलेले सुनील गावस्कर हेही एमसीजीवर हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींप्रमाणे त्यांचीही उत्कंठा वाढली होती.
दरम्यान, टीम इंडियाने विजय मिळवल्यावर गावस्कर यांनी वयासह सर्व बंधने झुगारत जोरदार आनंद व्यक्त केला. त्यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल असा होता. कसोटी क्रिकेटचा जमाना गाजवणाऱ्या गावस्करांनी टी-२० स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले, त्यामुळे सारेच जण अवाक झाले. त्यांच्यासोबत असलेले के. श्रीकांत आणि इरफान पठाणही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. गावस्करांनी केलेल्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.