पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने भारताला दमदार सुरुवात करून दिली. बाबर आजम ( ०) व मोहम्मद रिझवान ( ४) हे दोन्ही सलामीवीर १५ धावांत त्याने माघारी पाठवले. यानंतर रंगला खरा भारत-पाकिस्तान सामना. इफ्तिखार अहमद व शान मसूद यांनी डाव सावरल आणि ५० चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. अहमदने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि अक्षरच्या एका षटकात ३ षटकारासह २१ धावा कुटल्या. शान मसूदनेही अर्धशतक केले. परंतू, एक वेळ अशी होती, तिथे जर कॅच झाली असती तर मसूद ३१ धावांवरच बाद झाला असता...
आर अश्विनच्या गोलंदाजीवर शान मसूदने चेंडू हवेत टोलावला, हार्दिक पांड्याला सहज झेल घेता आला असता, परंतु चेंडू स्पायडर कॅमेराच्या वायरला लागला आणि चेंडूची दिशा बदलली. त्यानंतर रोहित शर्मा संतापला अन् डेड बॉलची मागणी करू लागला. मसूद तेव्हा ३१ धावांवर खेळत होता. मसूदने या चेंडूवर एक धाव घेतली. परंतू, अंपायरनी तो बॉल डेड बॉल देण्यास नकार दिला. झालं याचा बदला नाही घेणार तो भारत कसला...
भारताची इनिंग सुरु झाली होती. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ४ फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले.. आता भारताचं काही खरं नाही असंच वाटत असताना विराटने त्याचा क्लास दाखवला... २० वे षटक सुरु झाले. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. पंचांनी पाकिस्तानींची ही मागणी धुडकावली आणि त्या तीन धावा भारताला बाय देऊन टाकल्या...