नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या धावसंख्येला लगाम घालण्यात यश मिळवलं आहे. पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले असून, २५ षटकांच्या खेळानंतर पाकिस्तानच्या दोन बाद १२५ धावा झाल्या आहेत. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान मैदानात असून, त्यांच्यावरच पाकिस्तानच्या डावाची मदार असेल.
भारताने प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक यांनी जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांचा वेगवान मारा आरामात खेळून काढला. दरम्यान, इमाम उल हकने सिराजच्या एका षटकात तीन चौकार ठोकत १२ धावा वसूल केल्या. एकीकडे जसप्रीत बुमराहचा मारा अचूक होत असताना पाकिस्तानी सलामीवीर मोहम्मद सिराजला लक्ष्य करत होते. ७.५ षटकांमध्ये पाकिस्तानने बिनबाद ४१ अशी आगेकूच केली होती. मात्र याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने अब्दुल्ला शफिकला पायचित केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. अब्दुल्ला शफिकने २० धावा काढल्या.
त्यानंतर बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी मोर्चा सांभाळला. इमामने काही चांगले फटकेही खेळले. मात्र १३ व्या षटकात हार्दिक पांड्याने इमामचं काम तमाम करताना त्याला यष्टीमागे लोकेश राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. इमाम उल हकने ३८ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केली. याचदरम्यान, १४ व्या षटकात रवींद्र जडेजाने मोहम्मद रिझवानला पायचित केले. पण रिझवानने घेतलेल्या डीआरएसमध्ये चेंडून यष्ट्यांना लागत नसल्याचे दिसल्याने रिझवान बचावला.
मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत रिझवाने खेळपट्टीवर पाय रोवले. तसेच बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत पाकिस्तानला शंभरीपार नेले. २५ षटकांअखेर पाकिस्तानच्या २ बाद १२५ धावा झाल्या होत्या.