Rohit Sharma On IND vs PAK Test Series : भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटच्या मैदानातील कट्टर प्रतिस्पर्धी केवळ आयसीसी आणि आशिया चषकाच्या स्पर्धेत आमनेसामने येतात. बऱ्याच वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका झाली नाही. पण, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामने व्हायला हवेत, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. खरे तर या दोन्ही देशांमध्ये शेवटच्या वेळी २००७ मध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली गेली. (IND vs PAK Match)
रोहित म्हणाला की, पाकिस्तानी संघात चांगल्या खेळाडूंची फळी आहे. मी एक क्रिकेटपटू असल्याने प्रत्येक संघाविरूद्ध खेळण्यासाठी तयार आहे. म्हणूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका व्हायला हवी असे वाटते. रोहित 'Dubai Eye 103.8 YT' वर बोलत होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होईल का? या प्रश्नावर रोहितने सांगितले की, याबद्दल मला काही माहिती नाही. पण, मला वाटते की नक्कीच कसोटी मालिका व्हायला हवी. शेवटी मी देखील एक क्रिकेटर आहे. मला खेळायला आवडेल आणि आव्हान द्यायला आवडेल. मला कोणत्याही संघाविरूद्ध खेळायला आवडेल आणि पाकिस्तान हा एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडे अप्रतिम गोलंदाज आहेत. एकूणच त्यांचा चांगला संघ आहे.
रोहितने आणखी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नेहमीच काहीतरी वेगळेपण असते. हा सामना पाहण्यासाठी अवघे जग आतुर असते. लोकांना भारत आणि पाकिस्तान हा थरार अनुभवताना मजा येते. मी एक क्रिकेटर म्हणून माझी बाजू मांडतो. ही मालिका इतर संघांच्या सामन्यांप्रमाणेच सामान्य असेल यात शंका नाही. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे, तो देखील इतर सामन्यांप्रमाणेच असेल.