- रोहित नाईक
वरिष्ठ उपसंपादक (मुंबई)
क्रिकेट विश्वचषक एकदिवसीय सामन्यांचा असो किंवा टी-२० सामन्यांचा, भारत-पाकिस्तान संघांच्या चाहत्यांची आपल्या संघाकडून एकच इच्छा कायम असते, ती म्हणजे बस्स, हा सामना जिंका, विश्वचषक नाही जिंकला तरी चालेल. वर्ष १९९२ पासून भारत-पाक विश्वचषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध भिडत आहेत आणि प्रत्येकवेळी दोन्ही संघाचे चाहते म्हणतात, बस्स हा एक सामना कसंही करून जिंका. आज रंगणाऱ्या भारत-पाक टी-२० विश्वचषक लढतीतही चाहत्यांची हीच इच्छा असणार.
काय आहे या एका सामन्यात? का हा सामना चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो? क्रिकेट हा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांचा खेळ मानला जातो. या दोन संघांमधील ॲशेस मालिका क्रिकेटविश्वातील सर्वोच्च मालिका मानली जाते. त्यांच्यातील लढतही रोमांचक होते; परंतु जेव्हा भारत-पाक आमने-सामने येतात, तेव्हा इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचेही या सामन्याकडे लक्ष देतात.
भारत-पाकिस्तान यांच्यातील वैर नवे नाही. दोन देशांतील खुन्नस वेगळी सांगण्याचीही गरज नाही. मैत्रीचे कितीही हात पुढे केले, तरी खेळाच्या मैदानावर या दोन्ही देशांचे खेळाडू जीव तोडून खेळतात. मग तो खेळ कोणताही असो आणि त्यात हा सामना क्रिकेटचा असेल, तर एखाद्या युद्धाप्रमाणे वातावरण निर्माण झालेले असते. चाहत्यांमध्ये तर वेगळीच चुरस आणि चढाओढ रंगते. त्यामुळेच खेळाडूंवरही कमालीचे दडपण येते. एखाद्याने पढवल्याप्रमाणे दोन्ही संघांचे खेळाडू, ‘या सामन्यात आमच्यावर दडपण नसून आम्ही एका सामान्य सामन्याप्रमाणेच खेळू,’ असे ठामपणे म्हणण्याचा प्रयत्न करतात. होय, तो प्रयत्नच असतो. कारण यावेळी खेळाडूंवर किती दडपण असते हे त्या खेळाडूंनाच माहीत असते.
मुळात क्रिकेट सामना जिंकण्यासाठी सांघिक कामगिरी, चांगली फलंदाजी, गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणावर भर दिला जातो. भारत-पाक लढतीत मात्र सर्वांत महत्त्वाचे ठरते ते दडपण झुगारण्याची क्षमता. क्रिकेटमधील हा असा सामना आहे, ज्यात दडपणाचा यशस्वी सामना करणारा संघच जिंकतो. त्यामुळे, आजच्या सामन्यातही दडपण झुगारून सांघिक खेळ करणारा संघ जिंकेल.
टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामने
Web Title: Ind Vs Pak: That's it, win this match!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.