Sunil Gavaskar Virat Kohli, IND vs PAK Champions Trophy 2025: पाकिस्तान विरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी सहज विजय मिळवला. पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सौद शकीलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २४१ धावांची मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारताने पाकिस्तानवर आठ षटके राखून सहज विजय मिळवला. विराट कोहलीने केलेल्या खेळीचे सर्वच स्तरातून प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. केवळ भारतीयच नव्हे तर पाकिस्तानी आजी-माजी खेळाडूदेखील विराटच्या दमदार खेळीची प्रशंसा करताना दिसत आहेत. पण असे असताना सुनील गावस्कर मात्र विराट कोहलीच्या एका कृतीवर अतिशय नाराज असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यामागचे कारणदेखील सांगितले.
विराट कोहली मैदानावर फलंदाजी करत असताना खूपर चांगल्या फॉर्मात होता. त्याने अतिशय संयमाने आपला डाव खेळला. या सामन्यात तो मैदानावर अतिशय चपळाईन धावाही घेत होता. अशा वेळी विराटने एक धाव घेताना, पाकिस्तानी फिल्डरने फेकलेला चेंडू हाताने अडवला. चेंडू अडवला तेव्हा तो क्रीजच्या आतमध्ये होता, त्यामुळे कुणालाही या गोष्टीचे वावगं वाटलं नाही. पण सुनील गावसकर यांना मात्र ही कृती खटकली. त्यांनी याबाबत विराटवर नाराजी व्यक्त केली. "हा प्रकार खूपच विचित्र आहे. असं सहसा मैदानात घडत नाही. कोहलीने चेंडू आपल्या हाताने थांबवला आहे. जर यावेळी पाकिस्तानी खेळा़डूंनी अपील केले असते तर कोहलीला चेंडू हाताने अडवल्याप्रकरणी बाद ठरवण्यात येऊ शकले असते. इतक्या मोठ्या खेळाडूने मैदानावर असे वागणे शोभत नाही," असे गावसकर म्हणाले.
पुढे गावसकर म्हणाले, "चेंडू अडवण्याची काहीच गरज नव्हती. थ्रो आला असता आणि मागे निघून गेला असता. चेंडू अडवायला मागेही कुणीच नव्हते. एखादी अधिकची धावही घेणे शक्य झाले असते. मिडविकेटच्या फिल्डरला उडी मारून चेंडू अडवायचा प्रयत्न करावा लागला असता. पण तोवर भारताला आणखी एक धाव मिळून गेली असती. कोहलीला मैदानावर असताना चेंडू हाताने अडवायची काही गरज नाही. चेंडू आला तर त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे. कोहली नशिबवान ठरला की पाकिस्तानी खेळाडूंनी अपील केले नाही."