आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या गटसाखळीत भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हायहोल्टेज लढतीला आता काही तासच उरले आहेत. या लढतीपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने भारतीय संघाला इशारा दिला आहे. शनिवारी होणाऱ्या लढतीत भारताचा निम्मा संघ गारद करेन आणि नंतर क्रिकेटप्रेमींसोबत सेल्फी घेईन, असे शाहीनशाह आफ्रिदीने म्हटले आहे.
अहमदाबादमध्ये फिल्डिंग ड्रिलनंतर संघाच्या इतर खेळाडूंसोबत माघारी परतत असताना काही प्रसारमाध्यमांचे वार्ताहर आणि क्रिकेटप्रेमींनी शाहीन आफ्रिदीकडे सेल्फीसाठी आग्रह धरला. त्यावेळी शाहीन आफ्रिदी म्हणाला की, मी नक्कीच सेल्फी काढेन मात्र पाच विकेट्स घेतल्यानंतर.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानला आतापर्यंत भारताविरुद्ध विजय मिळालेला नाही. विश्वचषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताविरुद्ध खेळलेल्या सातही सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आहे. १९९२ च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा आमने-सामने आले होते. तेव्हापासून विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध सुरू झालेली ही पराभवाची मालिका जवळपास ३१ वर्षांनंतरही कायम आहे. आता शनिवारी होणाऱ्या लढतीत ही मालिका खंडित करण्याचा बाबर आझम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा इरादा असेल. त्यासाठी भारताच्या फलंदाजीला भगदाड पाडण्याची जबाबदारी शाहीन आफ्रिदीवर असेल.
शाहीन आफ्रिदीन आतापर्यंत खेळलेल्या ४६ एकदिवसीय सामन्यांत २४.०० च्या सरासरीने ८८ बळी टिपले आहेत. त्यात भारताविरुद्धच्या तीन सामन्यातील ५ बळींचा समावेश आहे. यावर्षी आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यात शाहीन आफ्रिदीने ३५ धावा देत भारताच्या ४ फलंदाजांना बाद केलं होतं. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये शाहीन आफ्रिदीला केवळ दोन बळीच टिपता आले आहेत.