बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धांचा थरार दिवसेंदिवस रंगत चालला आहे. आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. बर्गिंहॅम येथे पार पडणारा आजचा सामना दोन्ही संघासाठी 'करा किंवा मरा' असा असणार आहे. दोन्हीही संघ आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत होऊन इथे पोहचले आहेत. त्यामुळे आजचा सामना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दोघांसाठीही निर्णायक असेल. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघ तर बिस्माह महरूफच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाची आज अग्निपरीक्षा असेल. या सामन्यासाठी दोन्ही संघाकडून जोरदार तयारी सुरू आहे, दरम्यान आम्ही भारताचा पराभव करू असा विश्वास पाकिस्तानने व्यक्त केला आहे.
आजचा सामना निर्णायकपाकिस्तानच्या संघाचा आपल्या पहिल्या सामन्यात बारबाडोस कडून पराभव झाला होता. "आता मी आणि आमचा संपूर्ण संघ आगामी सामन्याची तयारी करत आहे. आमचा पुढील सामना भारताविरूद्ध आहे, ज्यामध्ये आम्ही विजयासाठी मैदानात उतरू आणि जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू," असे पाकिस्तानची खेळाडू निदा डारने म्हटले. पाकच्या संघाला विजयाचा विश्वास असला तरी आव्हान मोठे असणार आहे. याची कल्पना पाकिस्तानच्या संघाला देखील आहे, कारण मागील काही सामने पाहिले तर भारत नेहमीच पाकिस्तावर वरचढ ठरला आहे. मागील ११ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे पाकिस्तानवर नितांत वर्चस्व राहिले आहे.
लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानच्या पहिल्या सामन्यात बारबाडोसच्या संघाने त्यांचा दारूण पराभव केला होता. बारबाडोसच्या संघात वेस्टइंडिजच्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. तर भारतीय संघाला आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. जवळपास जिंकलेला सामना गमावल्याने भारतीय समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारताच्या वाघिणी पाकिस्तानला धूळ चारणार का हे पाहण्याजोगे असेल. आजचा सामना संध्याकाळी ४.३० वाजता सुरू होईल.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघहरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, तानिया सपना भाटिया, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राझकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.