Join us  

भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक

Sachin Tendulkar on India Win, Womens T20 World Cup INDW vs PAKW: पाकिस्तानवर ६ धावांनी विजय मिळवून भारतीय महिला संघाने गुणांचे खाते उघडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 8:38 PM

Open in App

Sachin Tendulkar on India Win, Womens T20 World Cup INDW vs PAKW: महिलांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आपला पहिला विजय नोंदवला. महत्त्वाची बाब म्हणजे भारताने हा विजय पाकिस्तान विरूद्ध मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १०५ धावा केल्या. पाकिस्तानकडून निदा दार हिने सर्वाधिक २८ धावा केल्या. तर अरूंधती रेड्डीने १९ धावांत ३ बळी घेतले. भारतीय संघाने १८.५ षटकात हा विजय मिळवला. शफाली वर्माच्या ३२, हरमनप्रीत कौरच्या २९ तर जेमिमा रॉड्रीग्जच्या २३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने संघाचे कौतुक केले.

"भारतीय महिला क्रिकेट संघाचे खूप खूप अभिनंदन. त्यांनी टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभवाची धूळ चारली. पहिल्या सामन्यातील सुमार कामगिरीनंतर असा विजय मिळवणे हे खूपच दमदार पुनरागमन म्हणावे लागेल. मला आशा आहे की यापुढील सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघ अप्रतिम खेळ करेल आणि सर्वोत्तम कामगिरी करत पुढे जात राहिल," असे ट्विट करत सचिनने भारतीय महिला खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.

दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या धावेवर त्यांची पहिली विकेट पडली. गुल फिरोजा बाद झाल्यावर सिद्रा अमीन आणि ओमायमा सोहेल देखील स्वस्तात बाद झाल्या. सलामीवीर मुनीबा अली आणि निदा दार यांनी थोडी झुंज दिली. पण मुनीबा १७ धावांवर आणि निदा दार २८ धावांवर माघारी परतला. तळाच्या फलंदाजीत फातिमा सनाच्या १३ आणि साएदा अरूब शाहच्या नाबाद १४ धावांमुळे पाकिस्तानने शतक गाठले. अखेर २० षटकात पाकिस्तानला ८ बाद १०५ धावाच करता आल्या. भारताकडून अरुंधती रेड्डीने ३, श्रेयांका पाटीलने २ आणि इतर तिघींनी एक-एक बळी टिपला.

१०६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृती मंधाना अवघ्या ७ धावात तंबूत परतली. शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रीग्ज या दोघींनी विजयाचा पाया रचला. शफाली ३२ धावांवर बाद झाली आणि तर जेमिमा रॉड्रिग्ज २३ धावांवर बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीतने २९ धावा केल्या आणि ती रिटायर्ड हर्ट झाली. अखेर दिप्ती शर्मा आणि संजीवन संजना जोडीने भारताला विजय मिळवून दिला. फातिमा सना २, सादिया-सोहेल दोघींना १-१ बळी घेतला.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानसचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानमहिला टी-२० क्रिकेटट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024