IND vs PAK, Women's World Cup 2022: महिला क्रिकेट विश्वचषक २०२२मध्ये भारतीय क्रिकेट संघ ६ मार्चला पहिला सामना खेळणार आहे. भारताचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मिताली राज हिने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. 'भारतीय संघाचं संपूर्ण लक्ष हे विरोधी संघातील खेळाडूंकडे नसून स्वत:च्या संघाच्या पूर्वतयारीवर आहे. पाकिस्तानला आम्ही चांगला खेळ करून दाखवूच. त्यांनीही खूप मेहनत केली असणार. त्यामुळे पाकिस्तानला कमी समजण्याची चूक आम्ही करणार नाही', असं स्पष्ट मत मिताली राजने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याआधी व्यक्त केलं.
भारत-पाक सामन्याबद्दल...
"पाकिस्तानचा संघ तुल्यबळ आहे. आमच्याप्रमाणेच त्यांनीदेखील या स्पर्धेसाठी चांगली तयारी केली असणार. या स्पर्धेत कोणत्याच संघाला कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही. प्रत्येक सामन्यासाठी आम्ही काही प्लॅन्स ठरवले आहेत. त्यानुसार आम्ही सर्व सामने आत्मविश्वासाने खेळू. आम्ही स्पर्धेची सुरूवात करण्यास खूपच उत्सुक आहोत. आम्ही पाकिस्तानशी खेळताना एक तुल्यबळ संघाविरोधात खेळायचं असा आमचा विचार मनात घेऊन मैदानात उतरू", असं मिताली राजने स्पष्ट केलं.
हरमनप्रीतच्या फॉर्मबद्दल...
"हरमनप्रीत ही संघातील महत्त्वाची खेळाडू आहे. संघाच्या मुख्य फळीतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. खेळपट्टीवर तिचं केवळ फलंदाजीसाठी जाऊन उभं राहणंही प्रतिस्पर्ध्यांसाठी धडकी भरवणारं असतं. हरमनप्रीत बरेच वेळा खालच्या फळीतील फलंदाजांसोबत खेळली आहे. तिला मधल्या फळीत खेळण्याचाही अनुभव आहे. सराव सामन्यात तिने जशी फलंदाजी केली आहेत त्यावरून ती नक्कीच चांगली फलंदाजी करेल असा आम्हाला विश्वास आहे", असं मिताली राज म्हणाली.
झूलन गोस्वामीच्या अनुभवाबद्दल...
"मी आणि झूलन गोस्वामी गेली अनेक वर्षे ड्रेसिंग रूममध्ये एकत्र आहोत. भारतीय संघासाठी खेळणं आम्ही दोघीही खूप एन्जॉय करतो. विश्वचषकातील अनेक विजय आणि पराजय आम्ही एकत्र पाहिले आहेत. झूलन आमच्या संघाची आघाडीची गोलंदाज आहे. तिने संघाला कधीही नाराज केलं नाहीये. त्यामुळे तिचा अनुभव संघासाठी खूप फायद्याचा ठरेल", असं मिताली म्हणाली.
भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक
६ मार्च - वि. पाकिस्तान१० मार्च - वि. न्यूझीलंड१२ मार्च - वि. वेस्ट इंडिज१६ मार्च - वि. इंग्लंड१९ मार्च - वि. ऑस्ट्रेलिया२२ मार्च - वि. बांगलादेश २७ मार्च - वि. दक्षिण आफ्रिका
भारतीय संघ - मिताली राज ( कर्णधार), हरमनप्रीत कौर ( उप कर्णधार) , स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया, दीप्ती शर्मा, रिचा घोष ( यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटीया ( यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव