Mushtaq Ahmed, India vs Pakistan ODI World Cup 2023: अनेक अपमान सहन करूनही पाकिस्तान क्रिकेट संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात पोहोचला. इतर संघांप्रमाणेच पाकिस्तानी संघाचेही भारतामध्ये भव्य स्वागत करण्यात आले. हैदराबादला पोहोचल्यानंतर मिळालेल्या प्रेमाने खेळाडू आणि क्रिकेट चाहते भारावून गेले. अशा गोष्टी आपणही शिकायला हव्यात, असे मत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले. पण असे असूनही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदने मात्र गरळ ओकली आहे.
मुश्ताक अहमद समा टीव्हीवर क्रिकेट विश्वचषकाच्या चर्चेदरम्यान अँकरला उत्तर देत होता. त्यावेळी तो म्हणाला की, हैदराबाद आणि अहमदाबाद राज्यात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. आमच्या टीमला तिथे खूप पाठिंबा मिळेल. खरं पाहता हा मुद्दा अँकरने सुरु केला होता. अँकर म्हणाला- भारतासोबत खेळण्यासाठी अहमदाबादला जावे लागेल. आम्हाला हैदराबादमधील चाहत्यांचा पाठिंबा मिळणार आहे. पूर्वी व्हिसाचा प्रश्न होता, पण आता सर्व मुद्दे बाजूला ठेवून आम्हाला पाठिंबा मिळत आहे. पाकिस्तानी संघाला चाहत्यांची कमतरता भासणार नाही. त्यावर बोलताना मुश्ताक अहमद म्हणाला, "भारतातील अहमदाबाद आणि हैदराबाद शहरात मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात येईल. पाकिस्तान संघाला येथे मोठा पाठिंबा मिळेल."
दरम्यान, पाकिस्तानी संघ हैदराबादमध्ये दाखल झाला तेव्हा पाकिस्तानी संघाचे भारतातील स्वागत पाहून अख्तर भारावून गेला. अख्तरने पोस्ट करत म्हटले, "पाकिस्तान क्रिकेट संघाचे भारतात झालेले स्वागत पाहून खूप आनंद झाला. हेच तर खेळाचे सौंदर्य आहे. हे देखील आपल्याला एक जाणीव करून देते की, आपण मागील एक दशक किंवा त्यापेक्षा जास्त काळ काय गमावत आहोत."