अहमदाबाद - क्रिकेट सामन्यातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत दोन्ही संघ एकमेकांना भिडतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल. तत्पूर्वी सामन्याचा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही भारत-पाकिस्तान हॅशटॅग ट्रेंड होत असून भारतीय चाहत्यांसह पाकिस्तानचे चाहतेही सामन्यासाठी उत्सुक आहेत. त्यासह, भारतीय संघाचे माजी खेळाडूही मैदानाकडे नजरा लावून आहेत. भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विट करत पाकिस्तानी चाहत्यांची फिरकी घेतली आहे.
विरेंद्र सेहवागने आपल्या हटके आणि मजेशीर ट्विटमुळेही चर्चेत असतो. मैदानावर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणारा सेहवाग सोशल मीडियाच्या मैदानातही हास्यांचे कारंजे फुलवताना दिसतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सेहवान नेहमीच उत्सुक असतो, त्यात मजेशीर कमेंटही करत असतो. सेहवागने एक शायरी ट्विट करत या सामन्यावर भाष्य केलंय. तसेच, पाकिस्तानी चाहत्यांची फिरकीही घेतलीय.
ना इश्क मे, ना प्यार मेजो मजा है, पाकिस्तान की हार मे
अशी शायरी सेहवागने ट्विट केलीय. त्यासोबतच, मेक माय ट्रीपची एक जाहिरात शेअर करत, असं निमंत्रण कुणी देतं का? असे म्हणत पाकिस्तानी चाहत्यांची फिरकीही सेहवागने घेतली आहे. मेक माय ट्रीपच्या जाहिरातीमध्ये पाकिस्तानी फॅन्सला ओपन निमंत्रण देण्यात आलं आहे. या जाहिरातीमध्ये फुटलेला टिव्हीही दिसून येत असून मजेशीर कंटेट लिहिण्यात आला आहे. त्यामुळे, विरु पाजीने ही जाहिरात शेअर करत पाकिस्तानी फॅन्सची मजा घेतलीय.
प्रेक्षकांसह दिग्गजांची मांदियाळी
दरम्यान, या हायव्होल्टेज सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा सामना पाहण्यासाठी गुजरातसह इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक अहमदाबादेत पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी परदेशी प्रेक्षकही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आले आहेत. तर, सेलिब्रिटींचीही मांदियाळी मैदानावर दिसणार असून विराटपत्नी अनुष्का शर्मा, गायक अरजीत सिंग हेही अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. ब्लॉकबस्टर सामन्यामुळे अहमदाबादमधील हॉटेलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. काही प्रेक्षकांनी तर आरोग्य तपासणीच्या बहाण्याने अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती मिळाली आहे.
अनेक सेलिब्रिटींची हजेरी
अहमदाबादमध्ये होणारा हा शानदार सामना पाहण्यासाठी अनेक नामवंत व्यक्तीही मैदानावर पोहोचणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, रजनीकांत, आधार पूनावाला यांचा समावेश आहे. या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमचे दरवाजे सकाळी 10 वाजल्यापासून प्रेक्षकांसाठी उघडले जाणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता मैदानात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १२.३० वाजता मैदानात १.३० लाख प्रेक्षकांसमोर अरिजित सिंग, सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन परफॉर्म करणार आहेत.
७ हजार पोलीस तैनात
प्रेक्षकांच्या सोयीसाठी मैदानाजवळ १५ पार्किंग प्लॉट करण्यात आले आहेत. सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये धावणाऱ्या मेट्रो आणि बीआरटीएस सुविधांची फ्रीक्वेंसी वाढवण्यात आली आहे. या सर्व सुविधा रात्री दीड वाजेपर्यंत उपलब्ध असतील. अहमदाबाद पोलिसांनीही हाय व्होल्टेज सामन्यासाठी विशेष तयारी केली आहे. मैदानाच्या आत आणि बाहेर सुमारे ७,००० सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. एनएसजी आणि आरएएफसह केंद्रीय पोलीस दलही मैदानात तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातूनही विशेष पाळत ठेवली जाणार आहे.