India vs Pakistan, : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) हा कायमच भारताशी आणि BCCI शी स्पर्धा करत असतो. भारतात IPL च्या घवघवीत यशानंतर PCB ने पाकिस्तान सुपर लीग (PSL) सुरू केलं. पाकिस्तानी खेळाडूंवर IPL मध्ये बंदी घातली गेली. त्यामुळे PSL च्या माध्यमातून पाकिस्तान भारताशी स्पर्धा करतं. तशातच PCB चे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी काही दिवसांपूर्वी थेट IPL ला आव्हान दिलं. PSL मध्ये जर ऑक्शन पद्धत सुरू झाली तर IPL खेळायला कोणीही जाणार नाही, असं त्यांनी ओपन चॅलेंज दिलं. पण या बड्या बाता करणाऱ्यांना भारताच्या माजी क्रिकेटपटूने त्यांची जागा दाखवून दिली.
काय म्हणाले होते PCBचे अध्यक्ष रमीझ राजा?
''आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी आम्हाला नवीन सोर्स तयार करायला हवा. पुढील वर्षी PSLच्या रचनेत बदल करून ऑक्शन पद्धत आणायची आहे. ऑक्शन सुरू केल्यानंतर अनेक प्रायोजक आकर्षित होतील. हा पैशांचा खेळ आहे. जर आम्ही PSL मध्ये ऑक्शन सुरू केलं आणि फ्रँचायझींच्या मर्यादा वाढवल्या, तर PSL सोडून कोण IPL खेळायला जातं, तेच बघूया'', अशी दर्पोक्ती राजा यांनी केली होती.
भारतीयाने पाकिस्तानला दाखवली त्यांची जागा..
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Akash Chopra) याने रमीझ राजा यांना उत्तर दिलं. "जरी तुम्ही ऑक्शन पद्धत आणलीत तरी काही फरक पडणार नाही. कारण तुम्हाला १६ कोटींचा खेळाडू झेपणार नाही. मार्केटमधील सेटअप तुम्हाला तसं करूच देणार नाही. स्पष्टच सांगायचं तर ख्रिस मॉरिसचा गेल्या वर्षीच्या हंगामातील एक चेंडूदेखील कित्येक खेळाडूंच्या मानधनापेक्षा जास्त होता. IPL, BBL, The Hundred किंवा CPL यांच्याशी तुलना करणं तुमच्या दृष्टीने खूपच अति आहे. खेळाडूंच्या किमती, फँचायजी च्या आर्थिक मर्यादा, संघांची किंमत हे सारं एकमेकांशी कनेक्टेड आहे. जर तुम्ही सारं काही वेगवेगळं पाहत असाल तर तुम्ही उद्ध्वस्त व्हाल", असं स्पष्ट मत त्याने मांडलं.