- अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर )आशिया चषकाच्या सुरुवातीलाच स्पर्धेची मुख्य लढत होत आहे. भारत-पाकिस्तान, क्रिकेटविश्वातील सर्वांत मोठी लढत आज रंगणार आहे. विशेष म्हणजे जगभरातून सुमारे १.५ अब्ज क्रिकेटप्रेमी या रोमांचक सामन्याचा आनंद घेतील. पूर्वीच्या काळी अनेक संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेची रचना अशा पद्धतीने व्हायची, जिथे भारत-पाकिस्तान सामना बाद फेरीत व्हायचा. यामुळे स्पर्धेकडे चाहत्यांकडे अधिक लक्ष राहील आणि आर्थिक फायदाही करून घेता येईल, हा त्यामागचा उद्देश असायचा; पण आता त्या कल्पकतेला महत्त्व राहिले नाही. कारण आज, भारत-पाकिस्तान हा सामना कोणत्याही स्पर्धेत आणि क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात ‘ब्लॉकबस्टर’च ठरतो.आयसीसी असो किंवा आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आयोजक म्हणून त्यांना २००७ सालच्या टी-२० स्पर्धेचा थरार अपेक्षित असतो. त्या विश्वचषक स्पर्धेच्या सलामीला आणि अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध भिडले होते. हे दोन्ही सामने अत्यंत रोमांचक रंगले आणि या सामन्यांमधून केवळ प्रचंड प्रेक्षक आणि नफा मिळाला नाही, तर उपखंडामध्ये टी-२० क्रिकेटची क्रेझही प्रचंड वाढली. याच माध्यमातून पुढे आयपीएल आणि इतर टी-२० लीग सुरु झाले. यंदाची सहा संघांचा समावेश असलेली आशिया चषक नक्कीच १६ संघांच्या समावेशाने रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान भव्यदिव्य नसणार. पण असे असले तरी भारत-पाकिस्तान सामन्यातील थरार किंचितही कमी झालेला नसणार. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा रविवारच्या ‘हायव्होल्टेज’ सामन्याकडे खिळल्या आहेत. दोन्ही संघ गोलंदाजीच्या दृष्टीने कमजोर भासत आहेत; कारण दोन्ही संघांचे प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. भारतीय संघ प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि टी-२० स्पेशालिस्ट हर्षल पटेल यांच्याविना खेळणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तान प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्याविना खेळणार असून वेगवान गोलंदाज मोहम्मद वसिमदेखील दुखापतग्रस्त झाला आहे. फिरकीमध्ये दोन्ही संघ तुल्यबळ दिसत असून हार्दिक पांड्याच्या रूपाने भारताला मोठा फायदा होईल. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त असल्यानेच भारताचे पारडे काहीसे वरचढ दिसत आहे. कर्णधार रोहित शर्माकडे गोलंदाजीच चांगले पर्याय आहेत; पण यामुळे भारतीय संघाला मोठी संधी आहे असे ठामपणे म्हणता येणार नाही. विसरू नये की, गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकामध्ये याच पाकिस्तानने पूर्ण क्षमतेने खेळणाऱ्या भारताला नमवले होते.दोन्ही संघांत मजबूत फलंदाजफलंदाजीमध्ये भारतीय संघाकडे आक्रमक आणि अनुभवी फलंदाजांची सेनाच आहे. विशेष करून आघाडीच्या फळीत स्वत: कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या आक्रमक फलंदाजांची क्षमता सर्वांनाच ठावूक आहे.सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांच्यामुळे भारतीय फलंदाजी जबरदस्त मजबूत दिसते. पाकची मदार कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांच्यावर आहे. फखर झमानची बॅट तळपल्यास भारतीय संघ अडचणीत येऊ श्कातो.कोहली-बाबर लढत रविवारी पुन्हा एकदा कोहली आणि बाबर यांची फलंदाजी पाहण्याची मजा घेता येईल. या दोन खेळाडूंमध्ये सातत्याने तुलना होत असून, या लढतीतही ती होणारच. २०१९ सालच्या विश्वचषकात कोहली सर्वोत्तम फलंदाज म्हणून खेळला, बाबर त्यावेळी युवा होता. आता बाबर कोहलीच्या जवळपास येत असून, त्याला सध्याच्या‘फॅब फोर’चे दरवाजे खुणावत आहेत. बाबर तिन्ही प्रकारामध्ये सातत्याने धावा काढत आहे. सध्या त्याची सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणनाही होत आहे. कोहलीवर लक्षकर्णधार रोहित शर्मा चांगल्या लयीमध्ये असून, त्याने गेल्या काही सामन्यांत चांगली खेळी केली. परंतु, तरी मोठी खेळी करण्यात त्याला यश आलेले नाही. पाकिस्तानविरुद्ध ही कसर भरून काढण्यास तो नक्कीच उत्सुक असेल. दुसरीकडे, साहजिकच सर्वांचे लक्ष विराट कोहलीकडे असेल. मोठी विश्रांती घेऊन तो मैदानात उतरणार असून, यामुळे तो नक्कीच ताजातवाना होऊन खेळेल. या जोरावर तो आपला दर्जा दाखवून देण्यात यशस्वी ठरेल. शिवाय आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात आपले स्थान किती भक्कम आहे, हेही तो सिद्ध करून दाखवेल. या सामन्यातील भक्कम खेळीच्या जोरावर कोहली निवकर्त्यांचा विश्वासही जिंकेल.
हेही विसरू नका ! गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषक लढतीत कोहली वगळता भारताचे प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. दुसरीकडे, पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सहज संघाला विजयी करताना भारतीय गोलंदाजांना दाद दिली नव्हती. तसेच, भारताच्या काही फलंदाजांना अद्यापही अनेक गोष्टींमध्ये स्वत:ला सिद्ध करून दाखवायचे आहे. राहुल दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. नुकताच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो पूर्णक्षमतेने खेळताना दिसला नाही.
सामन्याची वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)प्रतिस्पर्धी संघ :भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि अवेश खान.पाकिस्तान : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन आणि हसन अली